गडचिरोली: नोकरीचं आमिष दाखवून गडचिरोलीच्या एका विवाहित युवतीवर सोलापुरात बलात्कार झाल्याचा आरोप आहे.


बेरोजगारीचा फायदा घेत नर्सिंगची नोकरी लावून देतो, असं आमिष पीडित तरुणीला दाखवण्यात आलं.  मात्र तिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथं नेऊन, बळजबरीने तमाशात काम करायला लावलं. इतकंच नाही तर बलात्कारही झाल्याचा आरोप, तरुणीने केला आहे.

पीडित तरुणी गडचिरोलीच्या कुरखेडा येथील रहिवासी आहे.  पीडित युवतीच्या माहितीवरुन गडचिरोलीच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी युवतीची सुटका केली.

या प्रकरणांतील आरोपी दलाल राजू माटेला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

राजू माटे हा गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज इथला रहिवाशी आहे. त्याने पीडित तरुणीला नर्सिंगची नोकरी देण्याचे आमिष दाखविले. ही युवती बेरोजगार होती. राजूवर विश्वास ठेवून ती सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याला गेली. तिथे गेल्यानंतर राजूने त्या युवतीला बळजबरीने तमाशात काम करायला लावले आणि तमाशा फडात बलात्कार केला, असा आरोप संबंधित युवतीचा आहे.

नोकरीच्या नावावर आपली फसगत झाली असल्याचे लक्षात येताच, त्या पीडित युवतीने मदतीसाठी गडचिरोलीचे शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र चंदेल यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला आणि आपबिती सांगितली.

ही गंभीर घटना कळताच शिवसेनेच्या पादाधिकाऱ्यांनी सोलापूर गाठून पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांना घटनेची माहिती दिली.

एसपी प्रभू यांनी तात्काळ वाकी-शिवने येथील कमल ढोलेवाडीकर तमाशा मंडळाच्या खोलीवर धाड टाकली. तिथे आरोपी राजू माटे, पीडित युवती आणि त्यांच्यासोबत इतर सात मुली आढळून आल्या.

त्या सात मुली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून पळवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपी राजू हा युवतींना नोकरीचे आमिष दाखवून बळजबरीने तमाशात काम करायला लावायचा, असंही समोर आलं आहे.

याप्रकरणी पोलिसांनी राजू आणि तमाशा फडाची मालकीण आणि व्यवस्थापकाला बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित युवतीने आणि शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत आपल्या सोबत इतर पीडित मुलींची सुटका केली. युवतींना नोकरीचे आमिष दाखवून फसविणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता, पोलिसांनी वर्तवली असून, न्यायालयाने आरोपींना 22 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.