गडचिरोली : नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात आता फाईव्ह स्टार आयसीयूची (ICU) निर्मिती करण्यात आली आहे. ज्या सुविधा मोठ्या खाजगी रुग्णालयात बघायला मिळतात आणि त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. त्या सुविधा आता जिल्ह्यातील गरीब आदिवासी आणि सामान्य रुग्णांना मिळणार आहे.


संपूर्ण जिल्हा हा नक्षलग्रस्त त्यामुळे जिल्ह्यात अजून विकासकामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. दुर्गम भागात नीट रस्ते नाही म्हणून रुग्णांना एकतर खाटेवर आणावे लागते तर काहींना घनदाट जंगलातून पायवाट करत जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पोहचावे लागते. या दरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याचं चित्र आपण बघितलं आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील पाहिजे ती सुविधा, नसल्याने रुग्णांना नागपूर किंवा चंद्रपूरला रेफर करावे लागत होते. मात्र, आता याच गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक ICU ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे योग्य वेळेवर योग्य उपचार या आयसीयूत रुग्णाला दिल जाणार आहे. आणि रेफर टू नागपूरला स्टॉप लागणार असून गरीब रुग्णांना Golden Hours मध्ये योग्य उपचार मिळणार आहेत.


ह्या ICU कक्षात प्रवेश करताना आपल्याला एका फाइव्ह स्टार हॉटेलात जात असल्याचा भास होतो. मात्र, हा ICU कक्ष फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा कमीही नाही. ह्या अत्याधुनिक आयसीयूच उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.


कशा आहेत सुविधा?
ह्या आयसीयूमध्ये 12 फुल्ल आटोमॅटिक बेड आहेत. या कक्षात व्हेंटिलेटरवर, सेंटर मॉनिटर, बेडसाईज मॉनिटर, सेंटर सक्सेम, CD deffidrillator, विशेष म्हणजे टेली आसीयू मशीनही इथे लावण्यात आली आहे, जी पहिल्यांदाच जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे. ह्या सुविधेने गडचिरोलीतून थेट दिल्ली किंवा इतर कुठेही उपचारादरम्यान तज्ञांचा सल्ला घेता येईल. या आईसीयूमध्ये मॉड्यूलर ऑपरेशन थेटर, लेबर रूम आणि ओटी, स्वतंत्र वैद्यकीय अधीक्षक कक्ष स्टाफ रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे 5 फिजिशियन डॉक्टर तर 12 स्टाफ नर्सची टीम असणार आहे. या अत्याधुनिक आयसीयुला लक्स कार्यक्रमांतर्गत नॅशनल सर्टीफाईड देखील देण्यात आलं आहे. हा अत्याधुनिक कक्ष अवघ्या आठ महिन्यात उभा राहिला आहे.


अतिमागास नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत जिथे आरोग्याच्या साध्या सुविधा दूर दूरपर्यंत नव्हत्या. तिथे आता एक पाऊल पुढे टाकत जिल्हाभरातून जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या गंभीर रुग्णांना इथेच योग्य उपचार मिळणार असून रेफर टू नागपूरला आता स्टॉप लागणार आहे.