उस्मानाबाद : जिल्ह्यातील चोराखळी (ता.कळंब) येथील नवले कुटुंबावर नियतीने क्रूर घाला घातला आहे. कोरोनाने एकाच कुटुंबातील चौघांचा (आई-वडिल व दोन मुले) मृत्यू महिन्याच्या आत झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे चोराखळी गावावर शोककळा पसरली असून गावकरी भीतीच्या सावटाखाली आहेत.


कोरोनामुळे एकाच घरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये हिंदीचे प्राध्यापक असलेले संजय नवले कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 15 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. ते साहित्यिकही होते. याची बातमी पुण्यात असलेल्या त्यांच्या आई-वडिलांना कळाली. ऊस्मानाबादेत अंत्यविधोला उपस्थित राहिले. मात्र, तेथेच त्यांची प्रकृती बिघडली.


पुत्र वियोगाचा धक्का सहन न झाल्याने त्यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं आणि आई-वडिलांचाही 23 एप्रिलला कोरोनामुळे मृत्यू झाला. वडील माणिकराव नवले हे माजी शिक्षण शिक्षण आधिकारी होते. त्यांची पत्नी मंदाकिनी नवले (वय 78) यांचाही मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू मधलं अंतर होतं दोन तास. त्यानंतर पुण्यात उद्योजक असलेले सुनील नवले (वय 51) यांचही कोरोनामुळे उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. मुळचे चोराखळी, ता. कळंब येथील रहिवाशी होते. शुन्यातून विश्व उभा करणाऱ्या चौघांचा 25 दिवसांच्या आत मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांनाही धक्का बसला आहे.