धुळे : खान्देशातील जळगाव घरकुल घोटाळ्यानंतर आता खान्देशातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा घरकुल प्रकरणात काँग्रेसचे माजी कामगार राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  सोमवारी धुळे जिल्हा न्यायालयात पोलिसांनी ही कारवाई केली.


जिल्हा न्यायालयाने डॉ. देशमुख यांना तात्पुरता जामीन दिला होता तो रद्द करण्यासाठी जिल्हा न्यायालयात कामकाज सुरु होते त्यावर सोमवारी न्यायाधीश उगले यांनी दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर माजी मंत्री डॉ देशमुख यांना दिलेला तात्पुरता जामीन रद्द केला. त्यानंतर पोलिसांनी हेमंत देशमुखांना ताब्यात घेतलं.

दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दलित आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेनुसार माजी मंत्री हेमंत देशमुख, यांच्यासह तीन तत्कालीन माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख, विक्रम पाटील, गुलाबसिंग सोनवणे.तसेच तीन तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, अमोल बागुल, राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांच्या खात्यात योजनेच्या ठेकेदाराने जवळपास पंधरा कोटींचा व्यवहार केला होता. घरकुल योजना राबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हाय पॉवर कमिटीचे हे सदस्य होते. त्यामुळे त्यांना देखील आरोपी करुन जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली. याशिवाय योजनेचे ठेकेदार संतोष जयस्वाल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख असे एकूण दहा आरोपी करण्यात आले. गिरीधारी रामराख्या यांच्यानंतर माजी मंत्री हेमंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तीन तत्कालीन नगराध्यक्ष , तीन मुख्याधिकारी, ठेकेदार आणि नाजीम शेख हे तात्पुरता जामीनावर आहेत .

माजी मंत्री डॉ.  हेमंत देशमुख यांच्यावरील आरोप

  • दोंडाईचा शहरात 77 कोटींची घरकुल योजना राबवून देखील त्याचे नित्कृष्ठ दर्जाचे काम करणे

  • शासनाचा पैसा खर्च करुन योजनेतील निधीच्या पैशाने बांधकाम झालेली शाळा स्वतःच्या ज्ञानोपासक शिक्षण सस्थेच्या शाळेला विनामूल्य देणे

  • योजनेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या कत्तलखाना ला आपल्या हस्तक च्या कंपनीला नाममात्र भाडयाने देणे

  • घरकुल योजना राबविताना ती खाजगी जागेवर राबविणे


दरम्यान, शासनातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅडव्होकेट देवेंद्र तंवर, आरोपी हेमंत देशमुख यांच्यावतीने अ‍ॅडव्होकेट अभयकुमार ओस्तवाल, अ‍ॅडव्होकेट सोनवणे, तर तक्रादार कृष्णा नगराळे यांच्यावतीने अ‍ॅडव्होकेट नितीन दुसाने यांनी बाजू मांडणार आहे.