Ex-CJI Uday Lalit: देशाचे ४९ वे सरन्यायाधीश राहिलेले मराठमोळे न्यायमूर्ती उदय लळीत (Uday Lalit) काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय दिले आणि त्यांच्या कारकीर्दीत काही वादही झाले होते. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी प्रलंबित असताना सरन्यायाधीश हे मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर आल्याने वादही निर्माण झाले होते. त्या कार्यक्रमातील उपस्थितीती बाबत माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. 


'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने उत्तरे दिली. आपल्या कार्यकाळात काही महत्त्वांच्या मुद्यांवर घटनापीठांची स्थापन केली. अधिकाधिक प्रकरणे निकाली निघतील याकडे लक्ष पुरवले असल्याचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सांगितले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित राहण्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणी स्पष्ट भाष्य केले. त्यांनी सांगितले की, तो कार्यक्रम मुंबई हायकोर्टाने आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित काही प्रकरणे सुप्रीम कोर्टात आहेत, ही बाब खरी आहे. पण ती माझ्या कोर्टासमोर, खंडपीठासमोर नव्हती असे माजी सरन्यायाधीशांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने हा कार्यक्रम आयोजित केल्याने मी तिथे उपस्थित होतो. तर, मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री  असल्याने तिथे उपस्थित होते.  एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. ती महापूजा वैयक्तिकपणे ते हजर नसतात. तर, राज्यातील जनतेचे प्रतिनिधी म्हणून ती पूजा त्यांच्या हस्ते होते.


मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला हे राज्यातील जनतेच्यावतीने उपस्थित असतात. मुंबई हायकोर्टाचा कार्यक्रम हा राज्यातील लोकांच्यावतीने आयोजित होता. एक मराठी माणूस राज्याबाहेर गेला असला तरी त्याला आपल्या मातीबद्दल, राज्याबद्दल एक ओढ, प्रेम असते. त्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि त्या कार्यक्रमाला राज्याचे प्रमुख, जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे त्यात काही वावग नाही असेही माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी स्पष्टपणे सांगितले. 


वाद काय होता?


सप्टेंबर महिन्यात सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुंबईत सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता.  या कार्यक्रमाला केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. 


राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सु्प्रीम कोर्टात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिंदे फडणवीस सरकारची वैधता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार असताना दुसरीकडे सरन्यायाधीशांनी मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर कार्यक्रमाला हजेरी लावल्याने विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले.