मुंबई : मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे ( Sameer Wankhede) हे राजकारणात येणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. आता समीर वानखेडे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. "मला देशाची, भारत मातेची सेवा करायची आहे. मग ते कोणत्याही स्वरूपात असो. मग राजकारण हा देखील देश सेवा करण्यासाठी प्लॅटफॉर्म असू शकतो का? असे म्हणत यावर आता काय सांगता येत नाही असे सांगत समीर वानखेडे यांनी राजकारणात प्रवेश करण्यावर थेटपणे उत्तर देणे टाळले. मात्र अप्रत्यक्ष राजकारणात येण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
सांगलीतील शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर समीर वानखेडे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, माझी जात काढली, मात्र त्यांना काही सापडले नाही. लोकांना काही काम नसते तेंव्हा बाष्कळ चर्चा सुरू होते. काही राजकारणी सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप करत असत. त्यावेळी मला लोक म्हणायचे तुला झोप येते का? तेव्हा मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचो. तेव्हा सर्व भीती निघून जायची आणि वाटायचे येऊ देत कितीही, हे तर किरकोळ आहे. त्यामुळं तुमचे आदर्श महापुरुष असले पाहिजेत असं मत व्यक्त समीर वानखेडे यांनी यावेळी व्यक्त केले.
ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यानंतर समीर वानखेडे वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) या दाम्पत्याची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिण्यात एका वर्तमानपत्रात जाहिरात आली होती. या जाहिरातीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. वाशिममधील एका वृत्तपत्रात जाहिरात देऊन वानखेडे दाम्पत्याने जिल्ह्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या होमपीचवर वानखेडे राजकीय डाव खेळणार का, अशी चर्चा या जाहिरातीनंतर सुरु झाली आहे. दिवाळीपासून सुरू झालेली ही चर्चा आज देखील सुरू आहे.
समीर वानखेडे गेल्या वर्षी नार्कोटिक्स ब्यूरोमध्ये मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी असताना त्यांनी चित्रपट सृष्टीतील अनेकांवर अमली पदार्थ संदर्भात कारवाया केल्या होत्या. आर्यन खान संदर्भातील क्रुझवरील कारवाईनंतर समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स विभागातून दुसऱ्या विभागात बदली देण्यात आली होती. त्याच मुद्द्यावर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांच्यातला वाद न्यायालय आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांची चेन्नईतील डीजीटीएसमध्ये बदली करण्यात आली आहे. सध्या ते तेथेच कार्यरत आहेत.