Jungal Safari At Kas Plateau :  सह्याद्रीच्या पर्वत रागांमध्ये असलेले कासचे पठार हे पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण राहिले आहे.  कास पठाराला युनोस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत स्थान दिले आहे. आता कासचे पर्यटन स्थळ एका नव्याने ओळखले जाणार आहे. कासच्या पठारावर आता नाईट सफारी सुरू होणार आहे. 


या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. फुलांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती येथे सापडतात. त्यामुळे पर्यटकांचा ओढा कासच्या पठारावर दिसून येतो. या पठारालगत असलेल्या सह्याद्री पर्वत रांगांचा भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे कास पठारासह लगतचा परिसरही पर्यटकांना आकर्षित करतो.


याच जंगल भागात कायमच बिबटे, जंगली गवे, भेकर, अस्वल आदी प्राण्यांचा वावर दिसतो. याचाच आधार घेत वनखाते आणि येथील वनसमितीने हा संपूर्ण परिसर उन्हाळ्यातही बहरलेला दिसावा यासाठी या ठिकाणी आता जंगल सफारी सुरु केली आहे. त्यासाठी दोन मोठी वाहने घेतली असून या खुल्या वाहनावर पर्यटकांना बसण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. सुमारे 50 किलोमीटरच्या परिसरात ही जंगल सफारी राहणार आहे. दोन बॅचमध्ये ही जंगल सफारी ठेवली आहे.


नाईट सफारीला विरोध


या नाईट सफारीला मात्र निसर्ग प्राणी मित्रांनी कडाडून विरोध करायला सुरुवात केली आहे. यामुळे प्राण्यांच्या अधिवासाला धक्का पोहचत असल्याचे प्राणी मित्र सुनिल भोईटे यांनी सांगितले. 


सध्या महाराष्ट्र सरकार महाबळेश्वर बामणोली येथील पर्यटन वाढीच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहेत. सध्याच्या बजेटमध्ये या विकासासाठी सुमारे 100 कोटी रुपये मंजूर झालेत. कामही सुरु झाले आहे. मात्र, त्यातील काही योजनांना प्राणी मित्र, पर्यावरण प्रेमींनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनाची आता कसोटी लागणार आहे. 


कास पठाराचे आकर्षण का ?


कासचा परिसर हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात  पठारावर विविध प्रकारचे रानफुले, फुलपाखरे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा दिसून येतो. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर असून क्षेत्रफळ अंदाजे १० चौकिमी आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. यातील काही फुलांच्या प्रजाती ह्या दुर्मिळ असून नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत.