शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका तरूनाने तरूणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करत स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या गोळीबारात सदर तरूणी बचावली असून तरूणाची प्रकृती मात्र चिंताजनक आहे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गावात एकतर्फी प्रेमातून विक्रम रमेश मुसमाडे या 30 वर्षीय तरूणाने गावातीलच 25 तरुणीच्या बंगल्याच्या मागील दरवाज्यातून आत प्रवेश केला. स्वयंपाक गृहात सदर तरूणी काम करत असताना विक्रम याने "माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील का?" अशी विचारणा केली. मात्र तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला. यावेळी तरूणीची लहान बहीण तेथे आली असता विक्रमने तिलाही मारहाण करत कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढून त्या तरूणीवर रोखला. त्यावेळी तरूणीच्या आजीने विक्रम यास जोराचा धक्का दिल्याने कट्यातून सुटलेली गोळी तरूणींच्या डोक्याला चाटून गेल्याने सुदैवाने ती तरूणी वाचली.
मात्र तरुणाने स्वतःच्या डोक्याला कट्टा लावत स्वतः वर गोळी झाडून घेतली यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेतली. तर फॉरेन्सिक लँबचे पथक, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी देखील घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला.