भिवंडी : देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनावर खबरदारी व उपाययोजना म्हणून देशात 3 मे पर्यंत दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. शासनाच्या या लॉकडाऊन निर्णयामुळे भिवंडीतील परप्रांतीय यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने अनेक कामगारांनी रस्त्याने पायी चालत घरची वाट धरण्यास सुरुवात केली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून आता या कामगारांना घरी जाण्यास रोखण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परप्रांतीय कामगारांना ट्रक चालकांनी घरी सोडण्याचे अमिष दाखवून कामगारांची लुट करण्यास सुरुवात केली आहे.


उत्तरप्रदेश येथे सोडण्यासाठी कामगारांकडून माणसी 3 ते 4 हजार रुपये उकळले जात आहेत. मात्र, घरी जाण्याच्या आशेपोटी कामगार या ट्रक चालकांना ही रक्कम देखील देत आहेत. एका ट्रकमध्ये 60 ते 70 कामगारांना कोंबुन सोशल डिस्टन्सचे तीनतेरा वाजविण्याचे काम या ट्रकचालक मालकांकडून होत आहे. पोलीस प्रशासनाकडून या ट्रक चालकांवर गुन्हे दाखल होत असूनही हे ट्रक चालक अशा प्रकारे कामगारांना ट्रकमध्ये घेऊन जाण्यासाठी का तयार होतात, याची खळबळजनक माहिती आता समोर येत आहे. ट्रक चालक या कामगारांकडून माणसी 3 ते 4 हजार रुपये घेतात. विशेष म्हणजे ट्रकमध्ये बसण्याआधीच ट्रकचालक, मालक कामगारांकडून ही रक्कम आधीच घेत आहेत. एका ट्रकमध्ये 60 माणसे जरी पकडली तरी दोन ते अडीच लाख रुपयांची रक्कम या कामगारांकडून ट्रक चालक मालक घेतात. मात्र, हे ट्रक नाकाबंदीत पोलीस पकडून ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करतात. मात्र, कामगारांना त्यांचे आगाऊ घेतलेले भाड्याचे पैसे त्यांना परत करण्यात येत नाही. त्यामुळे हाती असलेली तुटपुंजी रक्कम देखील हे ट्रक चालक घेऊन पसार होत असल्याने कामगारांवर उपासमारीसह आर्थिक संकट देखील उभे ठाकले आहे.


Coronavirus | राज्यात आज 811 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 7628


कामगारांचे पैसे परत कधी मिळणार?
पोलीस प्रशासन ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करतात. मात्र, कामगारांनी प्रवास भाड्यापोटी दिलेली रक्कम कामगारांना परत मिळत नाही. त्यामुळे येथील परप्रांतीय यंत्रमाग व रोजंदारी काम करणाऱ्या कामगारांची मोठी पिळवणूक व आर्थिक लूट होत असल्याने शहरातील कामगार आता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे या कामगारांचे पैसे ट्रक चालकांकडून परत मिळावेत, अशी मागणी हे परप्रांतीय कामगार पोलीस प्रशासनाकडे करतांना दिसत आहेत. सध्या तरी त्यांच्या नशिबी ट्रक चालकांनी भाड्यापोटी लूट केलेली रक्कम आली नाही. परिणामी भाड्याला भरलेले पैसे परत मिळावेत, अशी मागणी कामगार पोलीस प्रशासनासह ट्रक चालक मालकांकडे करत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन ठोस उपाययोजना करणार का? याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.


Gold Rates | जगभरातील शेअर बाजार कोसळल्याचा परिणाम सोने दरावर? सराफा बाजर बंद असल्याने मोठं नुकसान | स्पेशल रिपोर्ट