पुणे : भाजपचे आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी पुण्यातील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्याबाबात केलेल्या वक्तव्यांना मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला आहे. ज्या दर्ग्याबाबात हा वाद सुरु आहे त्या दर्ग्याचे विश्वस्त आणि मुस्लिम संघटनांनी आज पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली आणि भाजपच्या आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याचबरोबर समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी पोलीसांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 


पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम संघटनांनी दिला आहे. पुण्यातील कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्यातील बांधकाम पाडण्याची मागणी भाजपच्या आमदारांकडून आंदोलनादरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर मुस्लिम संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात आली.


ही मंडळी जाणून बुजून फक्त आणि फक्त स्वत:चे राजकीय हेतू साध्य करण्याच्या हेतूने आणि पुण्यासारख्या शांत शहराचे वातावरण खराब करण्याच्या हेतूने जातीय तणाव निर्माण करण्यासाठी “पुणेश्वर निर्माण समिती" सारख्या संघटना बनवून हिंदू- मुस्लीम समाजात तेढ आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचे आमदार असून देखील कुठल्याही स्वरूपाची सत्य आणि खरी माहिती न घेता सामान्य लोकांची दिशाभूल  करत आहे. आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांनी भडकाऊ आणि चिथावणीखोर धमक्यादेखील दिल्या आहेत, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. 


आमदार नितेश राणे यांनी स्वतःची लायकी दाखवत अत्यंत खालच्या पातळीत भाषण करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. तसेच आमदार महेश लांडगे याने देखील पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांचे नाव घेत धमकी दिलेली असून 48 तासांच्या आत जर कारवाई केली नाही तर बाबरीप्रमाणे मशीद पाडायची भाषा केलेली आहे. एकतर हे दोघे आमदार आमच्या भागाचे नाहीत, या दोघांचा काही एक संबंध नसताना फक्त शासकीय अधिकारी जे निरपेक्षपणाने काम करत आहेत त्यांना धमकवण्याचे काम केले असल्याचा आरोही त्यांनी केला आहे. 


पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्याचा वाद जुना आहे. याच मंदिराचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच मंदिर परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी समजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आहे.