मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा गांधी यांचा नथुराम गोडसे याला उद्देशून लिहिलेला काल्पनिक पत्र त्यांच्या ट्विटर, फेसबुकवर शेअर केला होता. हा पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलच वायरल होत आहे.

नुकतंच महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथी दिवशी अलिगढ येथे हिंदू महासभेच्या पुजा पांडे आणि काही कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या प्रतिमेला गोळ्या झाडल्या होत्या.


देशभरात या कृत्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर पुजा पांडेसह काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या सगळ्या प्रकारावर गांधीजींनी नथुरामला काय लिहिले असते, याबाबतचे हे काल्पनिक पत्र आहे.

पत्रातील मजकूर असा,

प्रिय नथुराम,

तू जिथे असशील तिथे सुखात असशील अशी आशा करतो. तुझ्या चाहत्यांनी पुन्हा एकदा प्रतिनिधिक स्वरुपात माझी हत्या केली. तीच बंदूक, त्याच गोळ्या, तेच डोके आणि आजही 70 वर्षांनी निशाण्यावर मी. विकृतीचे देखील चाहते असतात हे मी कधीच अमान्य केले नाही. परंतू, तुझ्या चाहत्यांनी तू माझी हत्या का केलीस याचे सत्य जाणूनच घेतले नाही. पंचगणीला माझ्या मागे सुरा घेऊन धावत असताना माझ्या अनुयायांनी तुला पकडले तेव्हा तुला मी वाचवले. त्यावेळी सुद्धा मी क्षमाशील होतो आज देखील आहे.

पण, कालच्या घटनेनं मी जरा हसलो, तू तीन गोळ्या झाडल्यानंतर 'हे राम' म्हणून मी प्राण त्यागला. आज माझी प्रतिकात्मक हत्या करणारे सुद्धा रामाचं नाव घेतात; तेव्हा त्यांचा आणि माझा राम वेगळा का? तुला आणि तुझ्या चाहत्यांना माझ्यासारख्या कृश माणसाची भिती असण्याचे नेमके कारण काय? हा प्रश्न मला नेहमी पडतो.

मला मारल्यानंतर तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून, 55 कोटींचा बळी, मुस्लिम धार्जिणा, फाळणीचा कारक, असे नानाविध गैरसमज पसरविण्याचा तुझ्या चाहत्यांनी चंग बांधला आहे. तरी सुद्धा कुठलाही प्रतिकार न करता माझ्या विचारांनी मनामनात घर केलं. त्यामुळेच कदाचित तुझे चाहते मला संपविण्यासाठी आजदेखील प्रयत्न करतात. परंतू जगभरात माझ्या पुतळ्यापुढे नतमस्तक होताना तुझ्या चाहत्यांना माझाच आधार घ्यावा लागतो.

याचा अर्थ मी कुठेतरी जिवंत आहे आणि तू देखील. माझी लढाई असत्याशी होती तुझ्याशी मुळीच नाही.

सुखी रहा,

तुझाच,
मोहनदास करमचंद गांधी