मुंबई : कोपर्डी बलात्कार प्रकरणावर मंगळवारपासून अहमदनगर सत्र न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकारतर्फे खिंड लढवत आहेत. कामकाज पाहण्यासाठी शासनातर्फे निकम यांना प्रतिदिन 35 हजार रुपये फी दिली जात आहे.

प्रतिदिन परिणामकारक सुनावणीसाठी 35 हजार रुपये, विचार विनिमय करण्यासाठी 10 हजार रुपये फी देण्यात येईल. विचार विनिमयाची फी प्रतितास असून त्याची कमाल मर्यादा दरदिवशी 30 हजारांपर्यंत असेल. त्याशिवाय हॉटेल लॉजिंग बोर्डिंगसाठी 5 हजार रुपये फी देण्यात येईल.

परिणामकारक सुनावणीचे दिवस संबंधित प्रकरणाच्या पर्यवेक्षीय पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून प्रमाणित करुन घ्यावेत, असं परिपत्रकात म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारचे  अतिरिक्त शुल्क प्रदान होणार नाही, याची दक्षता घेण्याचंही यात नमूद केलं आहे. निकम यांना अपरिणामकारक सुनावणीची फी देण्याची परवानगी नसल्याचाही उल्लेख आहे.

कोपर्डी प्रकरण : सुनावणी सुरु, पहिल्या दिवशी काय घडलं?


कोपर्डीत चिमुरडीवर झालेल्या बलात्कार आणि तिच्या हत्या प्रकरणी सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. या तिन्ही संशयित आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार

अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.