कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं कोरड्या विहिरीत उपोषण
एबीपी माझा वेब टीम | 07 May 2017 10:32 PM (IST)
शिर्डी : अहमदनगरमधल्या अकोले तालुक्यातील मन्याळे गावात एका शेतकऱ्यानं कर्जमाफीसाठी कोरड्या विहिरीत बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे. भैरवनाथ जाधव असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव आहे. भैरवनाथ जाधव यांनी 2005 मध्ये अकोलेच्या यशोमंदिर पतसंस्थेतून दीड लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण सततचा दुष्काळ, नापीकी आणि पिकाला हमीभाव नसल्यानं जाधव कर्जाची परतफेड करु शकले नाहीत. सध्या या कर्जाचे व्याजासह जवळपास सहा लाख रुपये झाले आहेत. त्याच्या वसुलीसाठी पतसंस्था उद्या या शेतकऱ्याची दहा एकर जमीन आणि घर जप्त करणार आहे. त्यामुळं कर्जमाफीची घोषणा होऊन जप्तीची कारवाई थांबवण्यासाठी जाधवांनी कोरड्या विहिरीत उपोषण सुरू केलं आहे. विशेष म्हणजे, पतसंस्थेनं जमीनीची जप्ती केली, तर विहीरीत विष प्राशन करण्याचा इशाराही जाधव यांनी दिला आहे.