पुणे : पुण्यात 18 जूनला शेतकरी पारतंत्र्य दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 18 जून हा दिवस 'शेतकरी पारतंत्र्य दिन' म्हणून पाळला जातो. यावर्षी पुण्यात 18 जून रोजी यानिमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिली घटनादुरुस्ती करून 18 जून 1951 रोजी शेतकऱ्यांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले, या दिवसाच्या निषेधार्थ शेतकरी पारतंत्र्य दिन पाळला जातो, अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक मयूर बागुल यांनी दिली. या कार्यक्रमात प्रदीप रावत (माजी खासदार), अमर हबीब (किसानपुत्र आंदोलन), आयुषी महागावकर (मुक्त पत्रकार) हे मार्गदर्शन करणार आहेत.
'18 जून 1951 रोजी शेतकऱयांना गुलाम करणारी घटनादुरुस्ती झाली. अवघ्या दीड वर्षात हंगामी सरकारने केलेली ही पहिली घटनादुरुस्ती होती. या दुरुस्तीने मूळ घटनेत नसलेले परिशिष्ट 9 अस्तित्वात आले. अनुछेद 31-B नुसार या परिशिष्टात टाकलेल्या कायद्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास मनाई करण्यात आली. या परिशिष्टात आज 284 कायदे आहेत, त्या पैकी 250 कायदे थेट शेतीशी संबंधित आहेत.' अशी माहिती किसानपुत्र मयूर बागुल यांनी दिली.
पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या, पदमजी सभागृह, टिळक रोड, येथे हा कार्यक्रम होणार आहे. 18 जून रोजी संध्याकाळी 5.30 ते 8 या वेळात हा कार्य़क्रम होणार आहे.