Dispute in Shivsena : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकांच्या घडामोडींमध्ये शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला देखील जोरात सुरूवात झालेली आहे. अर्थात या सर्वांच्या केंद्र स्थानी आहेत ते सेनेतील दोन बडे नेते! अनिल परब आणि रामदास कदम. दापोली नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी अनिल परबांनी तीन विद्यमान पदाधिकाऱ्यांना नारळ देत नव्यांची निवड केली. दरम्यान, त्यांचा हा निर्णय म्हणजे रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांना धक्का मानला जात आहे. कारण अनिल परब यांनी पक्ष शिस्तीचा भंग केल्याचं म्हणत उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुका प्रमुख प्रदिप सुर्वे, शहर प्रमुख राजू पेटकर यांना नारळ दिला.  उपजिल्हा प्रमुख म्हणून राजू निगुडकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून किशोर देसाई, तालुका प्रमुख म्हणून रुषिकेश गुजर आणि शहर प्रमुख म्हणून संदिप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.


दरम्यान, निवड केलेले तिन्ही पदाधिकारी हे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्या गटातील असून नारळ दिलेले पदाधिकारी हे रामदास कदम यांच्या गटातील असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे परब यांनी थेट कदमांना सुचक इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे. दापोली नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले असून काही अपक्षांनी देखील बंडाचा झेंडा फडकवला आहे, परिणामी आता निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. शिवाय, रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या पुढील चालीकडे देखील लक्ष असणार आहे. 


'मातोश्रीचा निरोप घेऊन आलोय'


रामदास कदम यांचे परबांविरोधात मोबाईल संभाषण पुढे आल्यानंतर पक्ष नेतृत्व कदम यांच्यावर नाराज असल्याचं पुढे आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री आणि मातोश्रीच्या जवळचे असलेले तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं आहे. शिवाय, या ठिकाणची सारी सुत्रं सध्या माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्याकडे आली आहे. हा देखील एक धक्का कदम यांना मानला जात आहे. याबाबात रत्नागिरी येथे बोलताना 'दापोलीला पक्ष प्रमुखांचा निरोप घेऊन आलो होतो. ज्यांनी शिस्तीचा भंग केला त्यांच्यावर कारवाई केली अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सध्या शिवसेनेचा हा आक्रमकपणा कदमांना दिलेला इशारा तर नाही ना? असा सवाल विचारत राजकीय वर्तुळात देखील एक चर्चा सुरू झाली आहे. 


काय आहे जागा वाटपाचा फॉम्युला?


दरम्यान, दापोली नगरपरिषदेतील 17 जागांसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार असून राष्ट्रवादी 9 तर शिवसेना 8 जागांवर लढणार आहे. मुख्य बाब म्हणजे या ठिकाणी सध्या शिवसेनेची सत्ता आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं 13 जागांवर निवडणूक होणार आहे. दापोलीमध्ये 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 22 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.