Sahyadri Devrai Sanstha : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेला झाडे लावण्यास परवानगी नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमींकडून निषेध होत आहे. महाराष्ट्रामध्ये झाडे लावण्यास भीक मागावी लागत असेल, तर याहून दुसरी कोणती वाईट गोष्ट नाही असे म्हणत सह्याद्री देवराई संस्थेला झाडे लावण्यास परवानगी नाकारल्याने महाराष्ट्रामधील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. जर या आडकाठीला कंटाळून सयाजी शिंदेंनी पर्यावरण आणि वृक्ष लागवडीची चळवळ थांबवली तर ते महाराष्ट्राला परवडेल का? असा सवालही या वृक्षप्रेमींनी उपस्थित केला आहे.


नेमकं प्रकरण काय
सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेला सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावातील पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी तीन वर्षांपुर्वी मिळाली. ही परवानगी सातारा पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून देण्यात आली होती. त्यानंतर  सातारा जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून काम करणाऱ्या तीन पोलीस अधीक्षकांनी ही परवानगी कायम ठेवली. मात्र, अचानक सातारचे विद्यमान पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सह्याद्री देवराई संस्थेला इथून पुढे म्हसवे गावातील पोलीस दलाच्या जागेत काम करता येणार नाही असे आदेश काढले आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी परवानगी नाकारल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.


दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री देवराई संस्थेला शासकीय यंत्रणांनी मदत करावी, असा आदेश देखील काढला होता.  त्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि सातारच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी या कामाच्या ठिकाणी भेट देऊन त्याची प्रशंसाही केली होती.  एवढच नाही तर सातारचे विद्यमान पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे देखील इथे वृक्षारोपणासाठी आले होते. मात्र अचानक अजयकुमार बन्सल यांनी सह्याद्री देवराई संस्थेला इथून पुढे म्हसवे गावातील पोलीस दलाच्या जागेत काम करता येणार नाही असे आदेश काढलेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी परवानगी नाकारल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.  मात्र, तीन वर्षांनंतर काम का थांबवण्यात येतेय, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेल नाही. पोलीस दलातील नोकरशाहीचा असा अजब अनुभव सयाजी शिंदेंच्या वाट्याला आला आहे.


सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेला साताऱ्यामधील म्हसवे गावातील पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी तीन वर्षांपुर्वी मिळाली होती. मात्र, आता ही परवानगी का नाकारली याची खंत सयाजी शिंदे यांनी एबीपी माझावर बोलून दाखविली होती. सांगलीतील भोसे मधील 400 वर्षापुर्वीचे वडाचे झाड वाचणाऱ्या  वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमींनी सयाजी शिंदेंना पाठींबा दर्शवला आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी झाडे लावण्यास आडकाठी घातली त्यांचा निषेध केला आहे. 


सह्याद्री देवराई संस्थेला पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी नाकारल्याची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. सह्याद्री देवराई संस्थेचा उपक्रम अतिशय चांगला असून याबाबतच्या अडचणी सोडवल्या जातील असं आश्वासन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलं आहे. पोलीस अधीक्षकांची परवानगी असताना तसेच विभागीय आयुक्तांचा होकार असताना एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश असताना देखील सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराई संस्थेला पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी नाकारण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय वर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


पोलीस दलाच्या जागेत सह्याद्री देवराई संस्थेला काम करता येणार नाही, पोलीस महासंचालकांनी परवानगी नाकारली


पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी नाकारली, एबीपी माझाच्या बातमीची गृहराज्यमंत्र्यांकडून दखल