बेळगाव: रेल्वेमार्ग ओलांडताना रेल्वेने जोरदार धडक दिल्याने एका हत्तीणीचा मृत्यू झाला आहे. रेल्वेने धडक दिल्यामुळे हत्तीण पुलावरून खाली कोसळली आणि गतप्राण झाली.

गोलिहळ्ळी वनभागाच्या हद्दीतील तावरगट्टी आणि भीषकेनट्टी रेल्वेस्थानका दरम्यान रेल्वे मार्गावर रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

पाच जणांच्या हत्तीच्या कळपातील नऊ वर्षाच्या हत्तीणीचा रेल्वेची धडक लागून डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती खानापूरचे एसीएफ सी.बी.पाटील यांनी दिली.

घटनेची माहिती कळल्यावर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.

घटनास्थळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तीची शवचिकित्सा केली. हत्तीचे डोके,पाठ यांना जबर मार बसल्यामुळे हत्तीणीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.