नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) या दोघांनाही आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत नोटीस बजावली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात धर्म, जाती, समूदाय आणि भाषेच्या आधारे एकदुसऱ्यावर टीका करत तिरस्कार पसरवल्याचा आरोप केला आहे. त्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसला नोटीस जारी करत 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना आदेश
निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा कलम 77 अन्वये दोन्ही पक्षाच्या पक्षाध्यक्षांना नोटीस जारी केली आहे. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरील आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची उत्तरे अनुक्रमे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून मागवण्यात आली आहेत. त्यात त्यांना 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आणि त्यांच्या स्टार प्रचारकांना आचारसंहितेचे पालन करण्यास सांगण्यात आलं आहे.
स्टार प्रचारकांच्या आचरणाची जबाबदारी राजकीय पक्षांनी घ्यावी
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदांवर असलेल्या लोकांच्या प्रचाराच्या भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात. स्टार प्रचारकांनी केलेल्या भाषणांची जबाबदारी स्वत:ला घ्यावी लागेल असं आयोगाने म्हटलं आहे. त्यानंतरही वादग्रस्त भाषणे झाल्यास निवडणूक आयोग प्रत्येक मुद्द्यावर पक्षप्रमुखांकडून उत्तरे मागणार आहे.
पंतप्रधानांच्या बांसवाडा विधानावर नोटीस पाठवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांसवाडा येथे दिलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस पक्षाने तक्रार केली होती. राजस्थानमधील बांसवाडा येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, काँग्रेस लोकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करून ते घुसखोरांमध्ये वाटप करणार आहे. काँग्रेसच्या तक्रारीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना नोटीस पाठवली आहे.
ही बातमी वाचा: