Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या निकालासहच महाविकास आघाडी सरकारच्या मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे 35 आमदारांसह भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. अशा वेळी नाराज एकनाथ शिंदेची मनधरणी करणं शिवसेनेला जमणार का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. एकनाथ शिंदेसह अइतर आमदारांचं बंड सफल झाल्यास महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना चांगलीच अडचणीत येणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपचा हा डाव उलथून पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.


नाराज एकनाथ शिंदे सध्या सूरतमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी आमदारांसह मिळून बंडाची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. या आमदारांना  काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचं सरकार मान्य नसल्यानं त्यांच्यात खदखद असल्याची सुत्रांची माहिती आहे. आमदाराच्या मनातील हील खदखद दूर करुन सरकार वाचवण्यात शिवसेना आणि मविआ सरकार यशस्वी होणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडामोडी घडतील याबाबत काही शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्या शक्यतांवर एक नजर टाकूया.


शक्यतांचा खेळ 


शक्यता 1 : आहे ते बंड थंड केले जाणे. एकनाथ शिंदेंनी हा प्रकार गैरसमजातून झालाय असं सांगून सारवासारव करणे.


शक्यता 2 : शिंदेंनी स्वतंत्र आघाडी स्थापन करून भाजपाला बाहेरून पाठिंबा देणे.


शक्यता 3 : शिंदे 37 आमदारांच्या पाठिंब्यासह भाजपा आघाडीचे सरकार स्थापन करून स्वतः उपमुख्यमंत्री बनतील.


शक्यता 4 : नाराजीमुळे शिंदे आणि इतर 13 किंवा अधिक आमदार, अपक्ष आमदार पक्ष न सोडता तटस्थ राहतील आणि सरकार पडू देतील.


शक्यता 5 : वरील चौथी शक्यता अंमलात आली तर, राज्याला स्थिर सरकार देण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी आणि भाजपा युतीचे सरकार स्थापन होऊ शकते. या परिस्थितीत कदाचित पवार स्वतः राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरू शकतील किंवा राज्य सरकामध्ये सुप्रिया सुळे यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.


ह्यापैकी कुठली शक्यता खरी ठरते हे येत्या काळातच कळेल.