Raj Thackeray & Uddhav Thackeray Rally: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल (4 जुलै) पुण्यातील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरून 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात' असा नारा दिल्यानंतर महाराष्ट्रात रणकंदन सुरु आहे. हिंदी सक्तीचा वरवंटा सुरूच असताना विरोधी पक्षांनी शिंदेंना घेरलं असून या घोषणेला मराठी अस्मितेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचा वक्तव्याचा दाखला दिला. दरम्यान, शिंदे यांनी गुजराती जयजयकार करत आज ठाकरे बंधूंच्या मराठी विजयी मेळाव्याला दारुगोळा दिल्याची सुद्धा चर्चा आहे. शिंदेंच्या गुजराती जयजयकारावर ठाकरे बंधू कसा समाचार घेणार आणि कोणता संदेश देणार? याकडे लक्ष आहे. दरम्यान, मराठी विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून वरळी डोममध्ये मराठी माणूस जमू लागला आहे. यावेळी पक्षीय झेंडा नसला, तरी हातातील फलक आणि टोप्या लक्ष वेधून घेत आहेत.
ठाण्याचा वाघ गुजराती पिंजऱ्यात
दरम्यान, शिंदेंच्या पुण्यातील गुजराती जयजयकारानंतर आज त्यांच्याविरोधातील फलकही दिसून आला. ठाण्याचा वाघ गुजराती पिंजऱ्यात, असा फलक दिसून आला. दरम्यान, शिंदे यांच्या गुजराती नाऱ्यावर सडकून टीका होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "चिकोडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले तेव्हा शरद पवार यांनीही 'जय महाराष्ट्र, जय कर्नाटक' असे म्हटले. याचा अर्थ असा होतो का की त्यांना महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक जास्त आवडते?" फडणवीस यांनी अशा टीकेला "संकुचित वृत्ती" असे संबोधले आणि म्हणाले की 'जय गुजरात' म्हणल्याने मराठी अस्मिता कमकुवत होत नाही.
आपली एकता आणि संस्कृती सुंदर
फडणवीस म्हणाले, "मराठी माणसाचे स्वप्न विशाल आहे, ते मर्यादित असू शकत नाही. आपण सर्व भारतीय आहोत आणि आपल्याला प्रथम आपल्या महाराष्ट्राचा अभिमान असला पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण इतर राज्यांचा अपमान करतो." त्यांनी असेही म्हटले की आपल्या एकतेचे आणि संस्कृतीचे सौंदर्य 'एक भारत'च्या भावनेत आहे आणि तिचे विभाजन करण्याचा कोणताही प्रयत्न केला जाऊ नये. भाषेच्या वादांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले, "मराठी भाषेचा अभिमान बाळगणे चुकीचे नाही, परंतु तिच्या नावाखाली हिंसाचार किंवा जबरदस्ती स्वीकारार्ह नाही. मराठी न बोलता एखाद्याला मारहाण करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे." ते म्हणाले की अशा प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत आणि दोषींवर कारवाई केली जात आहे. भविष्यात जर कोणी भाषेवरून वाद निर्माण केला किंवा कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या