मुंबई : ज्याने संभाजीराजांना हाल करून मारले, हिंदूंची मंदिरं तोडली असा औरंगजेब हा चांगला शासक कसा असू शकतो? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. औरंगजेब हा महापापी होता, त्याला चांगला म्हणणाऱ्या अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असंही ते म्हणाले. औरंगजेब हा चांगला प्रशासक होता. संभाजीराजे आणि त्याची लढाई ही धर्माची नव्हती तर राजकीय होती असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटलं. त्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 

औरंगजेब चांगला प्रशासक कसा? 

एकनाथ शिंदे म्हणाले की, "चाळीस दिवस संभाजीराजेंना हाल करुन मारलं. त्यांचा अपमान केला, अत्याचार केला. अशा अत्याचार केलेल्या औरंग्याला चांगलं म्हणणं हे दुर्दैवी आहे. त्याने हिंदूंची मंदिरं तोडली. त्याने गरिबांना लुटलं. आया-बहिणींवर अत्याचार केले. त्याने अनेकांना धर्मपरिवर्तन करायला लावलं. असा व्यक्ती चांगला प्रशासक होऊ शकतो? औरंगजेब महापापी होता."

अबू आझमींनी राष्ट्रपुरुष, देशभक्तांचा अपमान केला. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानाकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरमुळे वातावरण आधीच तापलं आहे. अशातच आता सपाचे आमदार अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताची जीडीपी सर्वात जास्त होता. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं. देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे असंही ते म्हणाले. अबू आझमींच्या या वक्तव्यावरुन नवा वादंग निर्माण झाला आहे. 

राम कदमांचा प्रश्न

भाजपचे आमदार राम कदम यांनी अबू आझमींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी यांना इतिहास माहिती नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. उद्या ते सभागृहात येतील तेव्हा मी त्यांना इतिहासाचं पुस्तक देणार आहे, असे राम कदम यांनी म्हटले.  औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कशाप्रकारे कैदेत ठेवलं, त्यांचा कशाप्रकारे अनन्वित छळ केला, हे अबू आझमी यांना माहिती नाही का, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.

 

ही बातमी वाचा: