मुंबई : आमचं सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी टीका झाली. मात्र, विरोधकच आडवे पडले. तिकडं करप्शन फर्स्ट होत असून इकडे नेशन फर्स्ट होत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 






मोदी साहेबांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र (Eknath Shinde on PM Modi)


एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदी साहेबांनी महाराष्ट्र पुढे नेल्याने मोदी साहेबांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र राहणार आहे विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही अर्थसंकल्प मांडला, तरी तुमचा व्यर्थसंकल्प सुरूच होता. अर्थसंकल्प कसा वाचावा समजून घ्यावा. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तक लिहिलं आहे, ते वाचा, असा टोला त्यांनी लगावला. विधिमंडळाचं कामकाज फेसबुक लाईव्ह करता येत नाही. काही जण आमदारकी वाचविण्यासाठी इथं येऊन फोटोसेशन करतात, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.  त्यांनी सांगितले की, दरवर्षी मालमत्ता करात वाढ व्हायची, मात्र आपण तो यावर्षी रद्द केला आहे. शासकीय दवाखान्यात एकही औषध पावती देता कामा नये. लंडनच्या धर्तीवर आपण रेसकोर्सवर सेंट्रल पार्क तयार करणार आहोत. कोणतही बांधकाम करणार नसल्याचे ते म्हणाले.  


आम्ही रस्ते धुतले, तुम्ही तिजोरी लुटली 


मुख्यमंत्री शिंदे यांच्या डीप क्लीन मोहिमेवरून पाण्याचा अपव्यय होत असल्याने आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेवरून शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही रस्ते धुतले, तुम्ही तिजोरी लुटल्याचे ते म्हणाले. बारीक लक्ष देऊन काम करावं लागत, फेसबुक लाईव्ह करुन जमत नाही, अशी टीका त्यांनी केली. अर्थसंकल्प अंतरिम असताना सर्व घटकांना न्याय दिला. काहीजण आमदारकी वाचवण्यासाठी मध्येच हजेरी सभागृहात दाखवतात. सभागृहात ऑनलाईन उपस्थित राहता येत नाही, नाही तर घरातून उपस्थित झाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला. सकाळी आपल्या सोबत चहा प्यायला असलेला नेता दुपारी आपल्या सोबत राहील की नाही हे सांगता येत नाही, देशाला मोदींची गॅरेंटी असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या