मुंबई : केवळ चर्चेत राहण्यासाठी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला, सभागृहातील राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मोदींवर टीका करून चर्चेत राहता येतं, त्यामुळे 'बाप तो बाप होता है' असा टोलाही शिंदेंनी नाना पटोले यांना लगावला. भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले आक्रमक झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
Eknath Shinde Slams Nana Patole : चर्चेत राहण्यासाठी नानांचे ते कृत्य
एकनाथ शिंदे म्हणाले की, "नाना पटोले ह विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना सभागृहाचे नियम माहित आहे. पण ते असे का वागले याची माहिती नाही. त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न पण केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे चर्चेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे दिल्लीतील लोकांना दाखवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं असावं. त्यांचे नेते राहुल गांधी हे परदेशात जाऊन मोदींवर टीका करतात. तसंच नाना पटोले यांनी केलं. पण बाप तो बाप होता है."
Nana Patole Suspension : नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केेलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाले. काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही, नाना पटोलेंनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. यानंतर नाना पटोलेंना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं.
Nana Patole On Farmers : काय म्हणाले नाना पटोले?
शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्याचे निलंबन अशी भूमिका राज्य सरकार घेत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, "राज्यातील शेतकऱ्यांना आज शुभेच्छा देतो. महायुतीचं सरकार आहे, त्यांची वास्तविकता आज समोर आली. कृषिमंत्री, आमदार हे शेतकऱ्यांना भिकारी समजतात. शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. बोनस देत नाहीत. कर्जमाफी करण्याची भूमिका मांडली होती, पीकविमा बंद केला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. रोज हा विषय मांडू, आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा."
ही बातमी वाचा: