मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा झाली. दरम्यान या चर्चेदरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची दिवाळी गोड होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. 


हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास राज्याचा तिसरा टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा पूर्ण होईल. या विस्तारामध्ये भाजपला 7, शिवसेनेला 5 आणि राष्ट्रवादीला तीन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे महामंडळांचे वाटप करून सर्व कार्यकर्ते, नेत्यांची दिवळी गोड करण्यावर चर्चा झाल्याचं म्हटलं जातय. महायुतीच्या सरकारचं अद्याप महामंडळाचे वाटप बाकी आहे. म्हणून या विस्तारामध्ये अजूनही महामंडळाचे वाटप होण्याची शक्यत आहे.


मराठा आरक्षणामुळे मंत्रिमंडळाचा विस्ताराला रेड सिग्नल?


राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. तर गावोगावी पुढाऱ्यांना आणि स्थानिक प्रतिनिधींना येण्यास बंदी देखील घालण्यात आलीये. दरम्यान याच मुद्द्यावरुन मंत्रिमंडळाचा विस्तार देखील रखडला असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश वरिष्ठांकडून या बैठकीत राज्य सरकारला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  


मंत्रिमंडळ विस्ताराचं  भिजतं घोंगडं


गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराचं भिजतं घोंगडं असल्याचं चित्र होतं. पण अजित पवारांनी सत्तेत सहभाग घेतला आणि वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा हा मार्गी लागला. पण या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारामध्ये शिंदे गटातील अनेक आमदार घोड्यावर बसून होते. पण ती  मंत्रीपदं राष्ट्रवादीकडे गेलीत.   त्यामुळे शिवसेनेतून नाराजीचे सूर उमटू लागले अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यातील विस्तार झाल्यास शिंदे गटातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तब्बल 13 दिवसांनी खातेवाटप करण्यात आलं. त्यामुळे यावेळी देखील जरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी मंत्र्यांना खातं मिळण्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दुसऱ्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थखातं देण्यात आलं आणि पुन्हा शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले. तर यावेळच्या विस्तारामध्ये अजित पवार गटाकडून गृहनिर्माण खात्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारांकडून नाराजी व्यक्त केली जाणार का हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल. 


हेही वाचा : 


Ajit Pawar : शिंदे-फडणवीस दिल्लीत, अजित पवार म्हणतात मला माहितीच नाही, मला विचारून गेले नाहीत