Eknath Shinde : लाडक्या बहिणीला विरोध करण्याचे काम सावत्र भावांनी केले होते, पण कोर्टानं त्यांच्या मुस्काटात लावल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते जालन्यात बोलत होते. लाडकी बहिण योजना कुठेही बंद होणार नाही. विरोधकांनी कितीही बोंबाबोंब केली तरी विश्वास ठेऊ नका. लाडकी बहिण योजना सुपर डुपर हिट झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
खरी शिवसेना कोणाची हे जनतेनं दाखवलं
काही लोक म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ, पण जनतेने न्याय दिला आहे. तुम्ही 97 जागा लढवल्या. त्यात 20 जागा आल्या असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. खरी शिवसेना कोणाची खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? यावर शिक्कामोर्तब जनतेने केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आता नवीन नवीन आरोप करु लागलेत, लहान पोरांसारखे लढायला लागले. घरात बसून निवणुका जिंकता येत नाहीत, त्याला लोकात जावे लागते, हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता बनून लढल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. हा मालक आणि नोकराचा पक्ष नाहीअसेही ते म्हणाले.
मी दिलेला शब्द पाळणारा
मी दिलेला शब्द पाळणारा, एकदा शब्द दिला की मागे हटणार नाही, ही बाळासाहेबांची आनंद दिघे साहेबांची शिकवण असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी जे शब्द दिले ते पूर्ण करण्याचे काम मी केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी आज माझ्या लाडक्या बहिणींचे, भावांचे शेतकऱ्यांचे आभार मानायला आलो असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.