Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते (NCP Sharad Pawar faction) एकनाथ खडसे स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आयुष्यातील 40 वर्ष भाजपत गेलेल्या खडसेंची घरवापसी होणार आहे. चार वर्षांपूर्वी खडसे यांनी भाजपला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, आता लोकसभा निवडणुकीपूर्वी ( Lok Sabha elections) भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. भाजपला उत्तर महाराष्ट्रात अपेक्षित बळ मिळत नसल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खडसेंना पुन्हा गळ टाकत स्वगृही परतण्यास सांगितल्याची चर्चा आहे.  


एमआयडीसी भूखंड प्रकरणामुळे अडचणीत


खडसे यांच्या राजकारणाची सुरुवात जनसंघापासून झाली होती. ते भाजपच्या संस्थापक नेत्यांपैकी एक आहेत. खडसे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये भाजपला सोडचिट्टी देत संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते सध्या राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) आमदार आहेत. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांची पक्षाच्या महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या विस्तारासाठी खडसे मदत करतील, अशी राष्ट्रवादी काँग्रेसला आशा होती, पण चौकशी आणि भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणामुळे ते अपेक्षेप्रमाणे काम करू शकले नाहीत. 


केंद्रीय नेतृत्वाकडून खडसेंना संपर्क


दरम्यान, 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भाजप नेतृत्व विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खडसेंच्या स्वगृही परतयण्यासाठी तयार नव्हते, अशी चर्चा आहे. भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  खडसे यांच्याशी संपर्क साधणारे केंद्रीय नेतृत्वच होते. भाजपला लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात कठीण आव्हानाचा सामना करावा लागत आहे. 


भाजप सोडताना फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप 


खडसे यांनी भाजप सोडताना फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर ठपका ठेवला होता. या दोघांनी उत्तर महाराष्ट्रातील आपली प्रतिष्ठा मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता खडसेंच्या पुनरागमनाच्या ते आड येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ खडसे हे लेवा पाटील असून ते ओबीसी आहेत. मराठ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर भाजप ओबीसींना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे.


दोन मतदारसंघात लाभ होणार?


खडसेंच्या पुनरागमनामुळे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातील दिलासा मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा आणि एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. 


उन्मेष पाटलांचा भाजपला रामराम


विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी जळगावमधून तिकीट नाकारल्यानं नाराज होऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. भाजपने आमदार स्मिता वाघ यांना येथून उमेदवारी दिली आहे. रावेरमध्ये दोन वेळा खासदार असलेल्या रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने सुद्धा अंसतोष आहे. त्यामुळे खडसे परतल्याने दिलासा मिळेल, अशी आशा आहे.  


खडसेंना मुख्यमंत्रीपदाची आशा पण... 


फडणवीस आणि खडसे यांच्यातील कटुता 2014 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत गेली. भाजप-शिवसेना युती जिंकल्यानंतर खडसे हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असल्याने त्यांना मुख्यमंत्री होण्याची आशा होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांची निवड केली. खडसे यांना महसूल आणि कृषी खाती दिली गेली.


भोसरीमधील जमिनीच्या व्यवहारावरून भ्रष्टाचाराचे आरोप


मात्र, काही वर्षांतच खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरीमधील जमिनीच्या व्यवहारावरून भ्रष्टाचाराचे आरोप झाले. महसूल मंत्री या नात्याने खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथील 3.1 एकर एमआयडीसी भूखंड खरेदी केला होता. किरकोळ किंमतीत हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली होती. यानंतर खडसे यांनी 2016 मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 


आता या प्रकरणांतून खडसेंना दिलासा मिळाल्याने ते भाजपमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मध्यंतरी त्यांनी न्यायालयाशी संबंधित कामासाठी अचानक दिल्लीला भेट दिली होती. चौकशी पूर्ण झाल्यावर खडसेंना मंत्रिमंडळात पुन्हा घेतले जाईल, असे आश्वासन पक्षनेतृत्वाने दिले, पण ते होण्याची वाट पाहत राहिले, पण संधी न मिळाल्याने ते नाराज होते. फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून पाहिले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढत्या प्रभावाबाबतही खडसे यांना संशय होता.


भाजपने तिकिट नाकारले


2019 च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपने खडसे यांना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून तिकीट नाकारले होते. त्याऐवजी पक्षाने त्यांची मुलगी रोहिणी यांना उमेदवारी दिली. मात्र, अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याकडून पराभूत झाल्या. मला खोट्या खटल्यात अडकवून फडणवीसांनी त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केल्याबद्दल खडसे उघडपणे बोलत होते. मात्र त्यांनी ते आरोप फेटाळले. न्यायालयाच्या आदेशानंतर तपास सुरू झाला. राजकीय सूडबुद्धीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे फडणवीस म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या