वीज कोसळून राज्यभरात आठ जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2017 10:26 PM (IST)
मुंबई: राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहे. यामध्ये आतापर्यंत तब्बल आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे. गडचिरोलीतल्या मुलचेरामध्ये मुसळधार पावसात वीज पडून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. तर नाशिकच्या चौंढी सिन्नरमध्ये वीज पडून बापलेकाचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ मवाळ आणि मयूर मवाळ अशी या दोघांची नावं आहेत. तर एक जण जखमी झाला आहे. तर नांदगाव तालुक्यातल्या पोही गावातही वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. तिकडे चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसात चिमूर तालुक्यातल्या कळमगाव इथल्या शिवारात गजानन चौधरी हा शेतकरी आणि त्याच्या दोन बैलांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.