औरंगाबाद : औरंगाबादमध्ये जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याचा जोरदार फटका तेथील प्रवाशांना आणि उद्योजकांना बसत आहे. मुंबई, दिल्ली प्रवासासाठीचे एअर इंडियाचे तिकीट कमालीचे महागले आहे. त्यामुळे प्रवाशांना मुंबई दिल्ली प्रवासासाठी 3 ते 4 हजार रुपये अधिक मोजावे लागतं आहेत.


मुंबईसाठी प्रवासासाठी आधी 5 ते 6 हजारात तिकटी मिळत असे मात्र आता हे तिकीट 8 ते 10 हजारात मिळत आहे. याशिवाय जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे एअर इंडियाचं मुंबईसाठी एक, दिल्लीसाठी एक आणि हैद्राबादसाठी एक अशी अवघी तीनच एअर इंडियाची विमाने उरली आहेत.


विमानांची संख्या कमी आणि मागणी जास्त असल्याने तिकिटाची किंमत वाढली आहे. याचा परिणाम औरंगाबादेतील उद्योग आणि पर्यटनावर होण्यास सुरुवात झाली आहे. उद्योजकांना विविध व्यावसायिक बैठकांसाठी देशभर प्रवास करावा लागतो. मात्र विमानांची संख्या कमी झाल्याने त्यांचा वेळ वाया जात आहे आणि पैसाही जास्त द्यावा लागत आहे.