मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या मागे पुन्हा एकदा ईडीचा ससेमिरा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरू असताना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब आणि यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.


 खासदार भावना गवळी यांनी शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीकडे तशा प्रकारची तक्रारही करण्यात आली होती. त्यानंतर आज भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीने छापा टाकत कारवाई करायला सुरुवात केली आहे. तर अनिल परब यांनाही हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्यासह अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्या वरती आरोप केले आहेत.


अनिल परब यांच्यावरील काय आहेत आरोप?


परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड गावी गैरकायदेशीर रिसॉर्ट बांधण्यात आलेल आहे.


साई रिसॉर्ट हे सीआरझेड 3 मध्ये दोनशे मीटरच्या आत मध्ये असल्याने यावर कायदेशीर कारवाई करावी


अनिल परब व त्यांचे सहकारी सदानंद कदम यांचे चार्टर्ड अकाउंटंट केतन जतानिया यांनी हे रिसोड बांधण्यासाठी 5 कोटी 42 लाख 24 हजार दोनशे रुपये खर्च आल्याचे सर्टिफिकेट दिलेला आहे.


तसेच अनिल परब यांनी 17000 चौरस फुटाचा रिसॉर्ट वर सन 2019- 20 ची घरपट्टी 14 नोव्हेंबर 2019 मध्ये आणि 2020 21 ची घरपट्टी 17 डिसेंबर 2019 रोजी भरलेली आहे.


महाराष्ट्र सरकार महसूल विभाग यांच्या रजिस्टर प्रमाणे याचे मूल्य 10 कोटी पन्नास लाखाहून अधिक होत आहे.


हे सर्व होत असताना अनिल परब यांनी 25 कोटी बाजार मूल्य असणारा हा रिसॉर्ट स्वतःच्या आयकर रिटर्न मध्ये कुठेही दाखवलेला नाही.


त्यामुळे ही बेनामी मालमत्ता नेमकी कुठून आली याचा तपास करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे


भावना गवळी यांच्यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले.


खासदार भावना गवळी यांनी 55 कोटी रुपयांचा कारखाना त्यांच्याच बेनामी कंपनीला अवघ्या 25 लाखाला दिला


मुख्यमंत्री कार्यालय यांच्या दबावाखाली फक्त एफआयआर केली पण कारवाई करण्यात आली नाही


भावना गवळी यांच्या कार्यलयातून 7 कोटी रुपये चोरीला गेले. एवढे पैसे आले कुठून?


भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर कारवाईला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर अशा स्वरूपाची कारवाई होणार असल्याचं यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबई महापालिकेच्या महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांचंही नाव आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या यादीमुळे अनेक नेत्यांमध्ये धाकधूक वाढलेली पाहायला मिळते. भाजपचे किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर ईडी अशा प्रकारची कारवाई करत असेल तर राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई ईडी करत असल्याचा आरोप ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.