मुंबई : मुंबईतील गगनचुंबी इमारतीच्या प्रकल्पात कुटुंबियांचा काळा पैसा गुंतवल्याने एका माजी मुख्यमंत्र्याची ईडीने चौकशी सुरु केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा माजी मुख्यमंत्री नेमका कोण आहे, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

मुंबईतील करी रोड येथील आलिशान प्रकल्पात खोटी कागदपत्र सादर केल्याने हा प्रकल्प आधीच वादात सापडला आहे. या प्रकल्पात माजी मुख्यमंत्री आणि त्याच्या कुटुंबियांचा जवळपास 300 कोटींचा काळा पैसा गुंतवल्याची चर्चा आहे.

दरम्यान विकासकाविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र माजी मुख्यमंत्री कोण आहे, याबाबत मोठा संस्पेंस तयार झाला आहे.

काय आहे प्रकरण?

ईडीकडून राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यांची तसेच अनिवासी भारतीय बिल्डरची 300 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. हा बिल्डर सध्या दक्षिण मुंबईत एक गगनचुंबी निवासी इमारतींचे संकुल उभारत आहे.

संबंधित माजी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी 300 कोटी रुपयांची रक्कम सायप्रस, मॉरिशअस या देशांमधील काही कंपन्यांमध्ये शेअर्सच्या स्वरूपात वळविली आणि तिथून ती मुंबईतील या इमारतीच्या उभारणीसाठी गुंतवली, अशी माहिती आहे. हे करताना 10 रुपयांच्या शेअरची किंमत एक हजार रुपये दाखविण्यात आली, असा ठपका ठेवण्यात आला आहे.