Nagpur: शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागिल काही दिवसांत पॉझिटिव्ह संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी शहरात 15 नवीन रुग्ण आढळले. यासह नागपुरातील सक्रिय रुग्णसंख्या 34 वर पोहोचली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.


कोरोना वर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. युवकांचे 12 वर्षावरील मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या बुस्टर डोससाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. ज्या नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना दोन्ही डोस घेउन लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. शाळा, महाविद्यालयात शिबिरे आयोजित करुन विद्यार्थ्यांना नर्सेस, डॉक्टरकडून नि:शुल्क लसीकरण करावे. 
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मनपा आरोग्य विभाग आणि प्रशासन पूर्णत: सज्ज झाले आहे. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सध्या 36 केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे. कुणालाही सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास त्यांनी मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावरून नि:शुल्क चाचणी करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले. सध्या नागपुरात 99 टक्के पेक्षा जास्त नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस आणि 79 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
शहरात 18 वर्षावरील वयोगटात 104 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून 84 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 15 ते 17 वर्ष वयोगटातील 66 टक्के पात्र व्यक्तींनी पहिला डोस घेतला असून 50 टक्के यांनी दुसरा डोस घेतला आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटामध्ये ३९ टक्के मुलांनी पहिला आणि 17 टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 18 ते 59 वयोगातील 6028 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
नागपूर शहराची लोकसंख्या 2685835 एवढी असून लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या 21,89,025 एवढी आहे. यापैकी पहिला डोस 21,72,014 नागरिकांनी आणि 17,34,625 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पात्र नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोना चाचणी, मनपाचा पुढाकार


Nagpur Covid Testing Centers : येथे करा निःशुल्क कोव्हिड चाचणी