परभणीत : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीत मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप असतो हे परभणीतील प्रकाराने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आयएएस आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. आज त्यांना पदभार घेण्याच्या सूचना होत्या. मात्र, जिल्ह्यातील काही नेत्यांच्या दबावातून त्यांना पदभार न देता चक्क अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे पदभार देण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी काढले आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नेत्यांना आयएएस अधिकारी नकोय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
राजकीय दबावातून
परभणीचे मावळते जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे पूर्वी साई संस्थानचे सीईओ होते. त्यांना दीड वर्षापुर्वी परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला. आज ते सेवानिवृत्त झाले. ते निवृत्त होण्याआधी 13 जुलै रोजी राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. ज्यात परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय त्यांना 31 जुलै रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडून पदभार घेण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे त्या मागच्या 3 दिवसांपासून परभणीत दाखल झाल्या होत्या. परंतु, जिल्ह्यातील काही नेते मुंबईत बसुन त्यांनी इथे रुजू न होता आपल्या मर्जीतील अधिकारी रुजू व्हावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश आले.
पालकमंत्री अनत्रिज्ञ
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी पुन्हा एक आदेश काढून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना आंचल गोयल याना पदभार न देता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे पदभार सोपविण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आंचल गोयल यांना परभणीतुन परतावे लागले आहे. यात विशेष म्हणजे परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांना आम्ही याबाबत विचारले असता त्यांना या बदली संदर्भात काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.