Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी  प्रा. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातवे कुलगुरु म्हणून सोमवारी प्रा. माहेश्वरी हे पदभार स्वीकारतील.  


राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी सद्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जैवशास्त्र प्रशाळेत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. माहेश्वरी यांच्या नियुक्तीची घोषणा शनिवार दि. ५ मार्च २०२२ रोजी केली. प्रा.माहेश्वरी यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.  


गतवर्षी प्रा. पी.पी. पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यपालांकडे कुलगुरू पदाचा राजीनामा पाठविला होता.  त्यानंतर ८ मार्च पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार सोपविण्यात आला होता.  कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी जम्मु-कश्मीर येथील उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती महेश मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. खरगपूर आयआयटीचे डॉ.वीरेंद्र कुमार तिवारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या गुरूवारी मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी प्रा. माहेश्वरी यांची शनिवारी कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे. सोमवार दि. ७ मार्च रोजी प्रा.माहेश्वरी हे पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान प्रा. माहेश्वरी यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून व सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 
  
प्रा. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांचा परिचय  - 
प्रा. विजय माहेश्वरी हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेतील जैवरसायनशास्त्र विभागात विभाग प्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट  1992 मध्ये ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात लेक्चरर म्हणून रुजू झाले.  त्यापूर्वी जैन एरिगेशन येथे सायंटिफीक ऑफीसर म्हणून सहा महिने काम केले. धुळे येथे  जवाहर मेडीकल फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयात जैवरसायनशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून काम केले. 29 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असलेल्या प्रा. माहेश्वरी यांचे संशोधन क्षेत्र हे प्रोटिन बायोकेमेस्ट्री, प्लॅन्ट टीश्यु कल्चर, मेटाबोलाईट्स असे आहे. त्यांनी “स्टडीज ऑन द मॅकेनिझम ऑफ अक्टीव्हेशन ऑफ इन्झामिस ऑफ फोटोसिन्थेटिक कार्बन रिडक्शन सायकल बाय लाईट”या विषयावर संशोधन केलेले आहे. विविध शैक्षणिक व प्रशासकीय समित्यांवर त्यांनी काम केलेले असून 22 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संपादन केलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. याशिवाय प्रा. माहेश्वरी यांना ‘यंग सायंस्टीस्ट’ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विविध फेलाशिप त्यांना मिळाली आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे संचालक, बीसीयुडीचे प्रभारी संचालक, जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. सध्या नॅक पूनर्मूल्यांकनाच्या स्टेअरिंग समितीचे समन्वयक म्हणून ते काम पाहत आहेत. प्रा. माहेश्वरी यांचे शंभरापेक्षा अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रसिध्द झालेले आहेत. त्यांची ४ पुस्तके प्रकाशित आहेत. केंद्रशासनाच्या अनुदान देणाऱ्या विविध संस्थाकडून प्राप्त 14 संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहे.  त्यांच्या नावावर एक पेटंट आहे.  विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेवरही त्यांनी काम केलेले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर राज्यपालांनी त्यांची सन 2014 मध्ये नियुक्ती केली होती.  अमेरिका, पाकिस्तान या देशांमध्येही त्यांना पाचारण करण्यात आले होते. वीसपेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी झाले आहेत.