सांगली : तहसीलदाराला मारहाण केल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास चंद्रहार पाटीलने विटा तहसिलदारांना मारहाण केली होती.


सांगली जिल्ह्यातील खानापूरचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना डबल महाराष्ट्र केसरी व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रहार पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. विटा शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातच चंद्रहार पाटील यांनी तहसीलदार शेळके यांना आपल्या साथीदाराच्या मदतीने मारहाण केली. काही दिवसांपूर्वी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली होती.त्यामध्ये चंद्रहार पाटील यांच्याही वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा समावेश होता.


कारवाईत जप्त केलेल्या गाड्यांवर तब्बल साडे सात लाख रुपयांचा दंड तहसीलदार शेळके यांनी ठोठावला होता. हा दंड कमी करावा अशी मागणी वारंवार चंद्रहार पाटीलकडून तहसीलदार शेळके यांच्याकडे करण्यात येत होती. मात्र तहसीलदार शेळके यांनी चंद्रहार पाटील यांना तुम्ही कायदेशीर अपील करा, मी दंड ठोठावला आहे आणि मीच पुन्हा दंड कमी करू शकत नाही, असं सांगितलं होतं. हाच राग मनात धरून आज दुपारी चंद्रहार पाटील हे विटा तहसील कार्यालयात पोहचले आणि तहसीलदार ऋषिकेश साळुंके यांना पुन्हा दंड कमी करण्याच्या मागणी करू लागले.


दरम्यान चंद्रहार पाटील आणि तहसीलदार शेळके यांच्यात वादावादी झाली. त्यातून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या साथीदाराने तहसीलदार शेळके यांना त्याच्या गाडीतून बाहेर काढून मारहाण केल्याचा जबाब तहसीलदारांनी पोलीस स्टेशनमध्ये दिला. शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विटा पोलीस ठाण्यामध्ये चंद्रहार पाटील आणि त्याच्या अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.