साहेब एवढ्यावर थांबू नका दोघेही एकत्र या, मराठी माणसाची एकजूट अख्ख्या देशाला दिसू दे, मोर्चा नाही तरी विजयी मेळावा व्हायलाच हवा; ठाकरे बंधूंना 'मनसे' साद!
राज ठाकरे यांच्या पोस्टवर कमेंट करताना अनेक मराठी जणांनी आता आपण साहेब एवढ्यावर थांबू नका दोघांनी एकत्र आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Raj and Uddhav Thackeray: राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय विरोधात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी जनामध्ये संतापाची लाट पसरली होती. सक्तीच्या हिंदीचा वरवंटा उखडून फेकण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डाॅ. दीपक पवार यांनी पहिल्यांदा वात पेटवल्यानंतर त्याची ठिणगी अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडली. यामध्ये अनेक मराठी जन एकत्रित झाले. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दोन मोर्चाची घोषणा झाली असताना मतभेद बाजूला सारत माय मराठीच्या संरक्षणासाठी आणि हिंदी सक्तीला फेटाळून लावण्यासाठी संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली. यानंतर महायुती सरकारची चांगलीच पळापळ सुरु झाली. मोर्चासाठी मराठी आवाज बुलंद होत जाताच महायुती सरकारने हिंदी सक्तीचे दोन जीआर रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे 5 जुलैचा प्रस्तावित संयुक्त मोर्चा रद्द करण्यात आला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चर्चेत आला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं
गेल्या काही दिवसांपासून मराठी माणसाची ताकद दुभंगली गेली आहे अशी चर्चा होत असतानाच मराठी माणसाने दाखवलेली एकजूट या निर्णयासाठी मोलाची ठरली. ही अशीच एकजूट महाराष्ट्र धर्मावरील संकटात निर्णायक राहावी अशी आता साद ठाकरे बंधूंना घातली जात आहे. सरकारकडून जीआर रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी पोस्ट करून मराठी जणांचे अभिनंदन केलं आणि अशी भीती कायम राहिली पाहिजे अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या पोस्टवर कमेंट करताना अनेक मराठी जणांनी आता आपण साहेब एवढ्यावर थांबू नका दोघांनी एकत्र आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी साद त्यांच्या पोस्टवर अनेकांनी घातली आहे.
उद्धव ठाकरे यांनी सुद्धा रविवारी आदेश रद्द केल्यानंतर बोलताना सुचक संकेत दिले आहेत. दरम्यान पाच जुलै रोजीचा मोर्चा रद्द करण्यात आला, असला तरी तो मोठ्या विजय मेळाव्यामध्ये रूपांतरित होणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल. परंतु उद्धव ठाकरेंनी याबाबत स्वतःच सुतोवाच केले असले तरी राज ठाकरे आज (30 जून) मनसे नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कोणता निर्णय घेतात याकडे सुद्धा निर्णय आकडे लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या























