बीड : बीड जिल्हा रुग्णालयात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पुरता गोंधळ उडाला. जन्मदाखल्यावर मुलीऐवजी मुलाची नोंद रुग्णालय प्रशासनाने केली आणि कुटुंबीयांना मात्र मुलगी सोपवण्यात आली. या ढिसाळ कारभारामुळे रुग्णालयात बाळाची अदलाबदल झाल्याच्या चर्चाही सुरु झाली.

बीडच्या जिल्हा रुग्णालयात एका दाम्पत्याला मुलगी झाली. मात्र रुग्णालय प्रशासनाने कागदोपत्री मुलगा झाल्याची नोंद केली आणि कुटुंबीयांकडे नवजात मुलगी सोपवली. कुटुंबीयांनी बाळ अदलाबदली झाल्याचा आरोप करत थेट पोलिसात धाव घेतली.

प्रकरण पोलिसात जाताच रुग्णालय प्रशासन खडबडून जागं झालं. बाळासह संबंधित दाम्पत्याची डीएनए टेस्टही करण्यात आली. अखेर डीएनए अहवालातून ती मुलगी त्यांचीच असल्याचं स्पष्ट झालं. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार वागण्यामुळे आरोग्य विभागाची चांगलीच नाचक्की झाली आहे.

दरम्यान याप्रकरणी बीड जिल्हा रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी अडचणीत आले असून त्यांच्यावर त्वरीत निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाप्रशासनाने देण्यात आले आहेत.