अहमदनगर : भगवानगड दसरा मेळाव्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी काल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्राला प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर आता प्रशासानेही दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदाही दसरा मेळावा गडाच्या पायथ्याशीच होण्याची शक्यता आहे.


पंकजा मुंडे समर्थकांनी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र पोलिसांचा गोपनीय अहवाल आणि अर्जदाराकडे विश्वस्तांचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नाही.

पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना पत्र लिहून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. तरीही शास्त्रींचा विरोध कायम आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे समर्थकांचं लक्ष लागलं आहे.

प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर गडावर दसरा मेळावा घेण्याच्या आशा आता जवळपास मावळल्या आहेत. त्यामुळे दसरा मेळावा होणार का, झाला तर कुठे होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुसरीकडे राज्यभरातील पंकजा मुंडे समर्थकांनी दसरा मेळाव्याची तयारी सुरु केली आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी अद्याप त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही.

पंकजा मुंडे यांचं पत्र

तसं आपल्यात काय झालं या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नाही. पण आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते आहे आणि लोकांची तळमळ बघून मी ठरवलं, कोणी मध्ये नको, मीच विनंती करते. शेवटी मी लहानच आहे. वारणीच्या गहिनीनाथ गडाच्या सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमात तसं म्हणाले होते ही, “मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा.” कृपया त्या असंख्य लेकरांकडे बघा! काही नको त्यांना फक्त 20 मिनिटं वेळ वर्षातून द्या. ते गरीब कोयता घेऊन जातील राबायला आणि मी ही परत येणार नाही. त्यांना काय मिळतं? तर त्यांच्या फाटक्या कुडात राहायची ऊर्जा मिळते, उन्हातान्हात राबायची ताकद मिळते. वेदनेत हसण्याची शक्ती मिळते. त्यांच्या किडकिडीत छातीत अभिमान भरुन नेतात, उर भरुन उत्साह घेऊन जातात. काट्या कुपट्यात, उन्हातान्हात राबतात. कोणी ऊसाच्या फडात तर कोणी राना, कोणी मुंबई सेंट्रलवर 4 बॅगा उचलून घेतं, 3 ऐवजी कोणी चेंबूरमध्ये रात्रभर टॅक्सी चालवतं. कोणी पोलिसवाला राबतो ट्रॅफिकमध्ये नाक्यावर. कष्ट करतात, परंतु हे सर्व भूषणाने स्वाभिमानाने वावरतात. तो स्वाभिमान वाढवणं आपल्याला जमलं तर करावं पण तो हिरावून घेऊ नये हे नक्की. मी कोणासमोर कधीही झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते आणि विनंती करते, तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या. माझ्यासाठी नाही पण त्या चेहऱ्यासाठी जे उजळलले राहावेत म्हणून मी संघर्ष यात्रा काढली. यांच्या डोळ्यात अश्रू असे न का पण जिवंतपणा असू देत यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे. समाज बांधणं जमलं नाही तर तो तोडणं तरी आपण होऊ देऊ नये. भक्तांना त्रास होऊ नये, कोणत्याही माझ्या भावाला इजा होऊ नये, त्यांच्या भावना जपण्यासाठी कृपया विचार करुन सकारात्मक निर्णय घ्याल ही अपेक्षा. शेवटी तुम्ही आणि मी यांच्यामुळेच आहोत व यांच्यासाठी काम करणं आपलं कर्तव्यच आहे.

संबंधित बातमी : पहिली आणि शेवटची विनंती करते, पंकजांचं नामदेव शास्त्रींना पत्र