Ashwini Bidre murder case : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर ताशेरे मारताना अभय कुरूंदकरला राष्ट्रपती पदकासाठी नाव सुनावणे फार गंभीर होते, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात झालेल्या तपासावरही न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. मयत अश्विनी बिद्रे मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावामधील आहेत. अश्विनी बिद्रे खून प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला हत्या प्रकरणी दोषी ठरवलं असून महेश पळणीकर, कुंदन भंडारी या दोघांवर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयानं यादिवशी अश्विनी बिद्रे यांची मुलगी आणि पती यांना हजर राहण्यास सांगितले आहे.
तत्कालिन पोलिस अधिकाऱ्यांवर कोर्टाचे ताशेरे
न्यायालयाने तत्कालिन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कडक ताशेरे ओढले. हत्या करून सर्च ऑपरेशन दोन वर्षांनी होतं, आरोपींचे मोबाईल एक वर्षांनी ताब्यात घेतले जातात. आरोपी अभय कुरूंदकर हा आरोपी नंबर वन असताना त्याचे नाव राष्ट्रपती पदासाठी दिलं जाते. हे गंभीर बाब आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. 11 एप्रिल 2016 मध्ये घडलेल्या या हत्याकांडाची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुमारे 7 वर्षे सुरू होती. या खटल्यात न्यायालयाने सुमारे 80 साक्षीदार तपासले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने तपास सुरू
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले की, कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर या आरोपींनी पुरावे नष्ट केले. बॅाडी खाडीत फेकून दिली. गोणीतून बॅाडीचे तुकडे नेण्यात आले होते. राजेश पाटीलला हत्येनंतर बोलवले होते. अभय कुरूंदकर त्याच्याशी बोलत होता. मात्र, तो प्रत्यक्ष गुन्ह्यांत सहभागी नव्हता. कोर्ट गुन्ह्यातील तपासाबाबत अत्यंत नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले. अभय कुरूंदकरने आपल्या पदाचा वापर करीत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने तपास सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. 1 जानेवारी 2017 रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एक वर्षांनी आरोपीला अटक करण्यात आली. अभय कुरूंदकरला राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करणे हे गंभीर होते. या प्रकरणात निष्काळजीपणा झाला. ज्यांनी याबाबत दुर्लक्ष केले त्या अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाणार असल्याचे ते म्हणाले. या गोष्टी सर्व मी रेकॅार्डवर आणणार आहे. तत्कालिन उच्चपदस्थांनी दुर्लक्ष करणे, निष्काळजीपणा करणे, आरोपीला मदत होईल असे वर्तन करणे हा प्रकार समोर आणणार असल्याचे ते म्हणाले.
अभय कुरुंदकरच्या मीरा रोड येथील घरात हत्या पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरनं आपल्या मीरा रोड येथील घरात 11 एप्रिल 2016 च्या रात्री हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर सहकारी राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या मदतीनं अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूड कटरने लहान लहान तुकडे केले. हे तुकडे काहीकाळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर ते वसईच्या खाडीत टप्याटप्यानं फेकून दिले. याप्रकरणी अभय कुरुंदकरला 7 डिसेंबर 2017 रोजी तर दुसरा आरोपी राजू पाटीलला 10 डिसेंबर 2017 रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर भंडारी आणि फळणीकर यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. सर्व आरोपींविरोधात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या