मुंबई : एसटीच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी खुशखबर दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही आता शिवशाही या वातानुकूलित बसमध्ये सवलत मिळणार आहे. येत्या 1 जून 2018 या निर्णयाची अंमलबजावणी होईल.


सध्या एसटीच्या साध्या, रातराणी आणि निमआराम बसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात 50 टक्के सवलत मिळते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरु झालेल्या शिवशाही बसमध्ये सुद्धा मिळावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी केली होती.

या मागणीची दखल घेत दिवाकर रावते यांनी याबाबत एसटी प्रशासनाला प्रस्ताव तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार सध्या सुरु असलेल्या वातानुकूलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या 45 टक्के तर वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसमध्ये (एसी स्लीपर) एकूण तिकीट मूल्याच्या 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.