Rohit Pawar on Ajit Pawar: सत्ताधारी नेत्यांचे नातेवाईक असोत, विरोधी नेत्यांचे नातेवाईक असोत, व्यावसायिक असोत, किंवा सरकारशी संबंध नसलेले नागरिक असो, नियम सर्वांसाठी लागू असून कारवाई झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. अशा प्रकरणांची शहानिशा झाली पाहिजे आणि काय खरे आणि काय खोटे आहे, हे लोकांसमोर आले पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. कुठलाही नेता किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य असो, जर चूक केली असेल, तर ती चूकच समजून योग्य कारवाई व्हायला हवी. मात्र, ही कारवाई करताना कुठेही भेदभाव होता कामा नये.
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून जमीन घोटाळे
रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जमिनी घोटाळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झाले आहेत. या भ्रष्टाचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे जबाबदार आहेत, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधील प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. त्यांनी या सरकारचे ब्रीदवाक्य "करून बोट चोरी करू करूया जमिनीची लूटमारी" असे झाले आहे आणि हे सरकार "गुन्हेगारांना जमीन आणि नेत्यांना जमीन" या विषयावर आलेले आहे, असा आरोप केला. रोहित पवार यांनी केवळ व्यक्तींवर नव्हे, तर गैरव्यवहार घडवणाऱ्या यंत्रणेच्या 'साखळी'वर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली आहे. पाठिंबा देणारे अधिकारी कोण आहेत, ते कसे वागतात, काही लोकांनाच महत्त्व का देतात आणि गरिबांची कामे का होत नाहीत, याची शहानिशा करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, रोहित पवार यांनी ट्विट करत “गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” सरकारची नवी योजना सुरु असल्याचा हल्लाबोल केला आहे. त्यांनी महायुती सरकारमधील जमीन घोटाळ्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्यांनी भाजप कार्यालयावरूनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” सरकारची नवी योजना
- नवी मुंबईत शिंदे साहेबांचा गट 5000 कोटीची सिडको जमीन
- पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – 1800 कोटीची जैन बोर्डिंग जमीन
- पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा- 500 कोटीची मोबोज हॉटेल कंपाऊंड इव्याकु प्रॉपर्टी ची जमीन
- संभाजीनगरमध्ये शिंदे साहेबांचा गट – #MIDC ची राखीव जमीन
- संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भाजपा – 200 कोटीची अंजली टॉकीजची जमीन
- पुण्यात अजित दादांचा गट –300 कोटीची कोरेगाव पार्क जमीन
- अहिल्यानगरमध्ये अजित दादांचा गट – जैन समाजाची जमीन
- नवी मुंबई विमानतळाजवळ अवैध गौण खनिज उत्खनन घोटाळा - 3000 कोटी
- मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – SRA च्या हजारो कोटींच्या जमिनी
- नाशिकमध्ये शिंदे साहेबांचा गट - त्र्यंबकेश्वर जमीन
- मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – भाजपा कार्यालयाची जमीन
करून वोटचोरी- करू जमिनीची लुटमारी
हे सर्व घोटाळे बघता शिवसेना शिंदे गट , भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कायदे -नियमांना धाब्यावर बसवून जमिनी लाटणारी “गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” अशी नवी योजना सरकारमार्फत सुरू केलीय असेच म्हणावे लागेल. “करून वोटचोरी- करू जमिनीची लुटमारी” असे नवे ब्रीदवाक्य सरकारने ठेवायला हरकत नाही.
‘आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कारटं’
भाजपशी संबंधित प्रकरणे आली की चौकशी आधीच क्लीन-चीट द्यायची आणि इतर दोन मित्रपक्षांची प्रकरणे असली की पॉलिटिकल स्कोर सेटल होईपर्यंत आणि पॉलिटिकल बार्गेनिंग होईपर्यंत चौकशीचा बनाव करायचा अशा प्रकाराची ‘आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्ट’ ही भाजपची कार्यपद्धती दिसून येते. परिणामी महाराष्ट्रात हे जे सर्व काही घोळ सुरू आहेत त्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून प्रामुख्याने मुख्यमंत्री जबाबदार असून आणि त्यांनी या सर्व घोळांची जबाबदारी घ्यावी. असो, मुख्यमंत्री या सर्वच प्रकरणांची कुठलाही भेदभाव न करता पारदर्शकपणे चौकशी करतील का? हे बघणं महत्वाचं ठरेल!
इतर महत्वाच्या बातम्या