नांदेड : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली. त्याचप्रमाणे कोकणातून मुंबईत परत येतानाही टोलमुक्ती देणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.
कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमुक्ती दिल्यानंतर परत येताना काय असा सवाल विचारला जात होता. त्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. नांदेडमध्ये दुष्काळ दौऱ्यादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. यातील अनेक वाहने ही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, तसेच अन्य मार्गावरून जात असतात. कोकणात सण उत्सवासाठी जाणाऱ्या अशा सर्व वाहनांना टोल मुक्ती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली. पण कोकणातून परत येताना काय असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यावर आता राज्य सरकारची भूमिका बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्यांना टोलमुक्त रस्त्याचा अनुभव घेता येणार आहे.