औरंगाबाद : नवस फेडण्यासाठी चक्क झाडाला उलटं लटकून झोका घेण्याची प्रथा एका गावात सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अवराळा गावातील ही अघोरी प्रथा आहे. लक्ष्मीदेवीच्या यात्रेत नवस फेडण्यासाठी महिला, पुरुष आपल्या लहान मुलाला हातात घेऊन हा झोका घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे.


अवराळा गावात लक्ष्मी देवीच्या यात्रेत सर्व गावकरी उलटं लटकून झोका खेळण्यात दंग आहेत. ही कुठली साहसी स्पर्धा नाही, तर लक्ष्मी देवीचा नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

भाविकांचे नवसही एकापेक्षा एक भन्नाट आहेत. कुणाचं लग्न होत नाही म्हणून नवस, तर कुणाची चारचाकी नीट चालत नाही म्हणून इथे नवस करण्यात येतो.

दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हजारो भाविक असा झोका घेतात. या प्रत्येक व्यक्तीला झोका घेण्यासाठी 20 रूपये मोजावे लागतात.  गावकऱ्यांच्या मते दिवसभरात 10 ते 15 हजार लोक असं स्वतःला उलटं टांगून झोका खेळतात.

नवस फेडणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे. पण कुठल्याही सुरक्षेची खरबरदारी घेतल्याशिवाय अशा पद्धतीने उलटं लटकून झोका घेणं जीवघेणं ठरु शकतं.