धुळे : कुख्यात गुंड गुड्ड्या शेखच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी विक्की ऊर्फ विकास श्याम गोयरच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. सटाणा तालुक्यातील मिताने येथून विक्कीला अटक करण्यात आली.


गुरुवारीच गुड्ड्याच्या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या हत्या प्रकरणातील गोयर गँगचा मुख्य सूत्रधार बडा पापा उर्फ विजय गोयर आणि श्यामभाऊ जोगीलाल गोयर हे दोघं अद्यापही फरारच आहेत. गुड्ड्या शेखच्या हत्येला 18 दिवस झाल्यानंतर ही अटक झाली आहे.

काय आहे प्रकरण?

18 जुलै रोजी धुळे शहरातील कराचीवाला चौकात गुड्ड्या ऊर्फ रफीयोद्दीन शफीयोद्दीन शेख या कुख्यात गुंडाची हत्या झाली होती. पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले.

गोयर आणि देवरे गँगने टोळी युद्धातून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या हत्येप्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या 15 वर गेली आहे. या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता.

गुड्ड्यावर धुळ्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. हत्येच्या काही दिवसांपूर्वीच गुड्ड्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं होतं.

यापूर्वी भीमा देवरे आणि योगेश जगताप यांना दोंडाईचा परिसरातून, तर गणेश पिवलला मध्यप्रदेशातील खांडवा येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी राजा भद्राचा भाऊ दादू देवरे यालाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. 22 जुलै रोजी सागर साहेबराव पवार या प्रमुख आरोपीला कामशेतमधून अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :


धुळ्यातील गुंड गुड्ड्याच्या हत्येचा तपास आता मुंबई क्राइम ब्रांचकडे


कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, तीन आरोपींना अटक


कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, दुसरा संशयित आरोपी अटकेत


कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, एका संशयिताला अटक


धुळ्यात कुख्यात गुंडाचा गोळ्या झाडून खून