मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले, मात्र यानंतर तक्रारदार महिलेवरच ब्लॅकमेल केल्याचे आरोप केले गेले, त्यामुळे या प्रकरणाने एक वेगळं वळण घेतलं आहे. संबंधित महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महिलेवर केले गेलेले आरोप केवळ तिला एकटं पाडण्यासाठी आणि आमची बाजू कमकुवत करण्यासाठी होत आहेत असंही वकील म्हणाले.


दर दोन मिनिटाला धमकीचे फोन येत असल्याने फोनच बंद केल्याचं वकिलांनी सांगितलं, जर मी स्वत: सुरक्षित असेन तरच मी माझा पक्ष मांडू शकेन, ही तक्रार करत असल्यामुळे आज ऐवजी उद्या स्टेटमेंट देण्याची मागणीदेखील मी केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.


मनिष धुरी आणि भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा एक प्रयत्न आहे असं वकिलांनी सांगितलं. या सर्वावर उद्या तक्रारदार स्वत: सगळा खुलासा करेल, तक्रारदारांना एकटं पाडण्यासाठी हे आरोप केले जात आहेत असं वकिलांनी म्हटलं. जे काही पुरावे आहेत त्याला सध्या गुपितच ठेवण्यात येईल. या प्रकरणावर चौकशी सुरू असल्यामुळे पोलीस आणि कोर्टासमोरच हे पुरावे सादर केले जातील, माध्यमांपासून सध्या पुरावे गुपित ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय असंही वकील रमेश त्रिपाठी यांनी सांगितलं.


धनंजय मुंडे प्रकरणात भाजप, मनसे नेत्यासह एका व्यक्तिचे 'त्या' महिलेवर गंभीर आरोप


धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली. मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्यानं देखील रेणू शर्मावर असाच आरोप केला आहे.


रेणू शर्मा यांनी मुंडेंवर काय आरोप केलेत?


रेणू शर्मा या महिलेने ट्विटरवरुन धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय. पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर रेणू शर्मा यांनी सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय? असा सवाल रेणू यांनी केल. पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केलाय.