मुंबई : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावर छगन भुजबळांनी वर्णी लागली. त्यानंतर आता धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (20 मे) रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले. त्यामुळे धनंजय मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि इतरांवर आरोप झाले. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने मुंडे यांच्यावरही आरोप झाले. त्या प्रकरणी दबाव वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
दुसरीकडे, मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले छगन भुजबळ सुरुवातीपासूनच नाराज होते. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा व्यक्त करत अजित पवारांवरही टीका केली होती. समता परिषदेच्या जागोजागी सभा, मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती. भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं. मात्र अजित पवारांची साथ सोडली नव्हती.
नंतरच्या काळात राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळांची वर्णी लागली.
Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे नाराज?
एकीकडे ओबीसी नेते छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. कारण भुजबळांना मंत्री केल्यानंतर पुढच्या काळात धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली. त्याचमुळे धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली.
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची काही वेळ चर्चा झाल्यानंतर हे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गेले.
भुजबळांच्या मंत्रिपदासाठी आठ दिवसांपूर्वीच चर्चा
दरम्यान, भुजबळांच्या मंत्रिपदासाठी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी एबीपी माझाच्या हाती लागल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक झाली होती. त्यानंतर छगन भुजबळांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली. या बैठकांमध्ये भुजबळांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाहांसोबत बोलणं झाल्यानंतरच मंत्रिपदासाठी भुजबळांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.