शिर्डी/सातारा/पंढरपूर : सलग सुट्टयांमुळे शिर्डीत साई बाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांनी अलोट गर्दी केली आहे. तर पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा तसेच वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. जशी भाविकांनी शिर्डी पंढरपूरात देवदर्शनासाठी गर्दी केली आहे, त्याचप्रमाणे राज्यातल्या पर्यटनप्रेमींनी सलग सुट्टीचा फायदा घेत राज्यातले सर्वात थंड हवेचे ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर गाठले आहे.

दिवाळीच्या पार्शवभूमीवर साईबाबांना साकडे घालत नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झालेत. भाविकांच्या गर्दीने शिर्डीतील रस्ते आणि बाजारपेठा गजबजुन गेल्या आहेत. साईदर्शनासाठी भाविकांना दर्शनाच्या रांगेत तासनतास वाट पाहावी लागत आहे. दिवसभरात दिड लाखांहून अधिक भाविक साईसमाधीचे दर्शन घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाकडुन व्यक्त करण्यात आला आहे.

पंढरपूरात तीन लाख भाविकांची गर्दी

आज पंढरपूर शहरी पर्यटकांनी ओव्हरपॅक झाले असून पंढरपूरला अक्षरशः शहरी यात्रेचे स्वरूप आले आहे. दिवाळी संपल्यानंतर धार्मिक पर्यटनासाठी अडीच ते तीन लाख शहरी पर्यटकांनी आज पहाटेपासून पंढरपूरमध्ये गर्दी केल्याने चक्क देवाच्या दर्शनाचीरांग दर्शन मंडपातून सारडा भवनापर्यंत पोहचली आहे. मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, रायगड यासह गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातूनही हजारो पर्यटक विठुरायाच्या दर्शनाला पोहचल्याने दर्शन व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. शहरातील हॉटेल लॉजेस भरले आहेत. ठिकठिकाणी गाड्या लावून भाविक निवासासाठी जागा मिळविण्यासाठी वाट पाहत थांबलेले दिसत आहेत.

महाबळेश्वरमध्येही जत्रा

दिवाळीची सट्टी आणि शनिवार,रविवार असा बेत आखुन सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची महाबळेश्वरात चांगलीच गोची झाली आहे. अवघ्या एक तासाच्या प्रवासाला तब्बल चार-पाच तास गाड्यांच्या रांगामध्ये अडकून पडण्याची वेळ आली आहे. महाबळेश्वर हे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते मत्र या ठिकाणी जाणारे रस्ते हे एकेरी असल्यामुळे गाड्यांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.