Shivsena on Shaktipeeth Expressway: देवा भाऊ म्हणतात शक्तिपीठ महामार्ग करून दाखवणार, पण आम्ही म्हणतो शक्तीपीठ महामार्ग गाडून दाखवणार. भुताटकी करणारा साताऱ्याचा गद्दार नगर विकास मंत्री कंत्राटदारांसाठी शक्तिपीठ महामार्ग आणतो, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना केला. कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडल. या मेळाव्यामध्ये बोलताना विनायक राऊत यांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले. राऊत म्हणाले की, माजलेल्या गद्दारांचा नि:पात करण्यासाठी आणि पुन्हा शिवसेनेचे सरकार येण्यासाठी अंबाबाईला साकडं आहे. त्यांनी सांगितले की लाडक्या बहिणींचा पंधराशे रुपयांवर आता यांचा डोळा आहे. त्यांना योजनेतून बाहेर ढकल जात असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाबद्दल जे वक्तव्य केलं आहे ते सरकार खरं करून दाखवत आहे. आपल्याला हवं तसे प्रभाग करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न ते करतील असा आरोप सुद्धा विनायक राऊत यांनी केला. राऊत यांनी राणे कुटुंबावर सुद्धा प्रहार केला. ते म्हणाले की हे आमच्या कोकणातील कोंबडी चोर उद्धव ठाकरेंवर बोलतो. मात्र भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्यासाठी हे पाळलेले आहेत. दरम्यान त्यांनी सुनील तटकरेंच्या विधानाचा सुद्धा समाचार घेतला. 

संजय पवार आम्हाला भेटून गेले

दोन राष्ट्रवादी एकत्र यायच्या असल्यास भाजपला विचारावं लागेल असं म्हणत असतील तर रायगडच्या भूमीतील लोक कसे काय बोलू शकतात असे विचारणा त्यांनी केली. कोल्हापूर महापालिकेत एक नगरसेवकाचा 51 नगरसेवक करावे लागतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, कोल्हापुरातील पक्षातील अंतर्गत वादावर राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, इंगवले यांचे नेतृत्वात झालेला मेळावा मोठा झाला. कार्यकर्त्यांची काळजी घेणारा जिल्हाप्रमुख तुम्हाला लाभला आहे. दरम्यान संजय पवार यांच्या अनुपस्थितीवर सुद्धा त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की संजय पवार आम्हाला भेटून गेले. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा दिवसाचा कार्यक्रम असल्याने ते गेल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवसेनेचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी हा निर्धार मेळावा 

आमदार सुनील प्रभू म्हणाले की शिवसेनेचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी हा निर्धार मेळावा आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये भगवा फडकवून दाखवा असे आवाहन सुनील प्रभू यांनी यावेळी केले. ढोंगी सरकार, भ्रष्टाचारी सरकार कशा पद्धतीने काम करत असल्याचे गावागावात समजावून सांगा असं त्यांनी सांगितले.  अंबाबाई मंदिराच्या आराखड्यासाठी एक रुपया या सरकारने दिला नसून गेल्या अनेक वर्षांपासून शहराची हद्दवाढ झाली नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे यांचं ढोंग जनतेसमोर आणा असे सुनील प्रभू यांनी यावेळी सांगितले.

निवडणुकी रुपी युद्ध समोर, कामाला लाग

नितीन बानगुडे पाटील यांनी सुद्धा हल्लाबोल केला. ते म्हणाले की मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येत असेल तर ते दुर्दैव आहे. अटकेपार झेंडा लावणारे आपणच आहोत. दिल्लीसमोर मुजरे करणारे हुजरे राज्यामध्ये तयार झाल्याचा टोला सुद्धा बानगुडे पाटील यांनी लगावला. इंग्रजांप्रमाणे यांनी देखील फोडा आणि राज्य करा हेच तंत्र अवलंबून असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राला शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे पक्षाची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भगवा फडकवावाच लागेल असे ते म्हणाले. शांततेच्या काळात ज्यांनी घाम गाळला त्याला युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही. निवडणुकी रुपी युद्ध समोर आहे त्यामुळे कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. 

इतर महत्वाच्या बातम्या