पुणे : रामोशी-बेडर समाजाला (Ramoshi Bedar communities) मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी 15 लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिली. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234  व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Continues below advertisement

इंग्रजांविरुद्ध पहिली ठिणगी पेटवणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच त्यांनी गनिमी काव्याच्या सहाय्याने ब्रिटिशांना धडा शिकवला. समाजाच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील

रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाला दोन लाख रुपयांपर्यंतचे बिनतारण कर्ज, तर उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी 15 लाख रुपयांचे कर्ज देण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. पोलीस भरतीसाठी विशेष योजना, तसेच शिक्षण व प्रशिक्षणाकरिता महाज्योती आणि सारथीमार्फत योजना राबवल्या जातील, असे आश्वासन  फडणवीस यांनी दिले.

Continues below advertisement

सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणे हेच शासनाचे ध्येय 

ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शासनाने ओबीसी मंत्रालय, महाज्योती आणि विविध महामंडळे स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती, 42 वसतीगृह व विविध प्रशिक्षण योजना सुरू केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारले, त्यांचे शिवकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

इंग्रजांच्या विरोधात संघर्षाची ठिणगी पेटवणारे उमाजी नाईक हे पहिले नेते

उमाजी नाईक हे इंग्रजांच्या विरोधात संघर्षाची ठिणगी पेटवणारे पहिले नेते होते. रॉबर्टने ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रात “उमाजी नाईक गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच लढतात” असा उल्लेख आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहत त्यांनी सामान्यांसाठी अज्ञापत्र काढले. त्यांच्या कार्याची दखल घेत इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी 10 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. रामोशी-बेडर समाजाला घाबरवण्यासाठी इंग्रजांनी त्यांना फाशी दिली. तरीही हा समाज स्वातंत्र्यलढ्यात मागे राहिला नाही. इंग्रजांच्या कारस्थानामुळे समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसला, जो स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी पुसला गेला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळेच राज्यात इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र मंत्री व विविध महामंडळे अस्तित्वात आली. महाज्योतीसारख्या संस्थेमुळे अनेक वंचित घटकांतील तरुण तहसीलदार, पोलीस निरीक्षक, वैमानिक होऊ शकले. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234  व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, विक्रम पाचपुते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल,  दौलत शितोळे, अंकुश जाधव, मोहन मदने आदी  उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

Eknath Shinde On Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं तुमच्यावर एवढं प्रेम अन् देवेंद्र फडणवीसांवर राग का?; एकनाथ शिंदे म्हणाले...