Almatti Dam : अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
Devendra Fadnavis : अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कृष्णा खोऱ्यातील पिके, मालमत्ता, जीवन आणि उपजीविकेला धोका निर्माण होऊ शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

मुंबई : कर्नाटकने जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढवू नये अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय लशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक पत्र लिहून ही विनंती केली. या धरणाच्या बॅक वॉटर आणि पूरस्थितीवर अभ्यास सुरू असून त्याचा अहवाल येईपर्यंत उंची वाढवण्याच्या निर्णय अविवेकी ठरेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, रुरकी यांच्याकडून अलमट्टी धरणाचे बॅक वॉटर आणि कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थितीवर अभ्यास सुरू आहे. त्यामुळे या संस्थेच्या अहवालाची वाट पाहावी असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे.
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519.6 मी. वरून 524.256 मी. करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या धरणाची उंची वाढवली तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराची स्थिती गंभीर होऊ शकते. पिके, मालमत्ता, जीवन आणि उपजीविकेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कृष्णा खोऱ्यातील परिसरावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कर्नाटक सरकारने पुनर्विचार करावा आणि अलमट्टी उंची वाढविण्याचा निर्णय थांबवावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात बॅक वॉटरमुळे वाढणारा पूरधोका, नदीपात्रातील गाळ साचणे, वाहतूक क्षमतेवर होणारा परिणाम आणि बंधाऱ्यांमध्ये साचणारा गाळ यासह पूरस्थितीची गंभीरता स्पष्ट केली आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्याकडे विनंती
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 31, 2025
कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची जलाशय पातळी वाढविल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह कृष्णा नदीकाठच्या परिसराला महापुराचा गंभीर फटका बसण्याची शक्यता आहे.…
अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर दोन्ही राज्यातील नदीकाठच्या गावांना त्याचा फटका बसणार आहे. नदीकाठच्या लोकांवर त्याचे परिणाम होणार आहेत. त्यामुळे धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाचा कर्नाटक सरकारने पुनर्वनिचार करावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ही बातमी वाचा:























