Devendra Fadnavis Exclusive : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलताना विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का? असा प्रश्न विचारला, त्यावर फडणवीसांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं.  जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी मिश्किल शैलीत अजित पवारांना चिमटा काढला. ते म्हणाले की, तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारलं तर त्यांना जास्त आनंद होईल. कारण त्यांचाही जुलैचा वाढदिवस आहे. पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकलीये पण आता त्याबद्दल काय सांगायचं, असं ते म्हणाले.  अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का असं विचारलं असता राज्यासमोर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही महत्त्वाचे प्रश्न सध्या आहेत, असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं. 


Devendra Fadnavis Exclusive : राज ठाकरेंसोबत युती करणार का? देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं वक्तव्य


तुमचं आणि अजित पवार यांचं नातं कसं आहे? असा प्रश्न केला असता फडणवीस म्हणाले की,  प्रश्न नात्याचा नाही. एका वृत्तपत्राने आम्हाला दोघांना एकमेकांविषयीचा लेख मागितला. आता एवढी वर्षे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे. वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टींबद्दल आमचं दुमत असेल, काही गोष्टींबद्दल विरोध असेल. पण त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान मान्य करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि म्हणून मी लेख लिहिला. त्यांनीही माझ्या कार्याविषयी त्यांना जे वाटतं त्याबद्दल लेख लिहिला आहे. त्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज नाही, असं फडणवीस म्हणाले. 


मुख्यमंत्र्यांशी व्यक्तिगत संबंध स्नेहाचे
फडणवीसांनी सांगितलं की, मी मुख्यमंत्र्यांना कधीही फोन करुन त्यांच्याशी बोलू शकतो. मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यावेळी फडणवीस म्हणाले, हो, मी उद्धवजींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही राजकीय विरोधक आहोत आणि ते आत्ता आहोत. गेली 25 वर्षे आम्ही एकमेकांचे मित्र राहिलो आहोत. आता त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आम्ही एकमेकांसमोर आहोत. वैयक्तिकरित्या अशी परिस्थिती नाही की, मला त्यांना शुभेच्छा देता येत नाहीत. मी कधीही फोन उचलून त्यांच्याशी बोलू शकतो.


यावेळी त्यांना मनसेला सोबत घेणार का असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत.  त्यांच्या पूर्वी भेटी झाल्या आहेत.  ज्यांची आमची भूमिका पटेल त्यांच्या सोबत जाण्यासाठी हरकत नाही.  आम्ही अनेक पक्ष सोबत घेतले आहेत जर ती वेळ आली तर त्यांचा विचार करू, असं फडणवीस म्हणाले.